कोण होणार विधानसभा हंगामी अध्यक्ष? राज्यपालांकडे पाठवली 6 दिग्गज नेत्यांची नावं

कोण होणार विधानसभा हंगामी अध्यक्ष? राज्यपालांकडे पाठवली 6 दिग्गज नेत्यांची नावं

सध्याच्या अस्थिरतेच्या काळात हंगामी विधानसभा अध्यक्षांना अतिशय महत्त्वाचं स्थान असून त्यामुळे विश्वासू आणि अभ्यास असलेल्या आमदाराकडे हे पद दिलं जाईल.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 25 नोव्हेंबर : राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात आज बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेली सिंचन प्रकल्पाच्या 32 पैकी 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यासाठी विधिमंडळातून सहा ज्येष्ठ आमदारांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.

विधीमंडळातून पाठवलेल्या यादीतील नावांपैकी एकाची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राज्यपाल निवड करतील. त्यामध्ये खालीलप्रमाणे नावं आहेत.

1) राधाकृष्ण विखे पाटील

2) कालिदास कोळंबकर

3) बबनराव पाचपुते

4) बाळासाहेब थोरात

5) के सी पाडवी

6) दिलीप वळसे पाटील

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेला 'हा' नेता होऊ शकतो विधानसभेचा हंगामी अध्यक्ष

विधीमंडळाने राज्यपालांना पाठवलेल्या यादीमध्ये कालिदास कोळंबकर यांच्या नावावर हंगामी अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण, रविवारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात पत्रकारांना माहिती देताना आशिष शेलार यांनी कोळंबकर यांचा उल्लेख सर्वात ज्येष्ठ विधानसभा सदस्य असा केला. भाजपला आपल्या आमदारांवर विश्वास आहे. त्यांना कुठेही वेगळं ठेवण्याची गरज नाही. ज्यांना आमदार फुटण्याची भीती वाटते तेच आमदारांना कोंडून ठेवत आहेत असंही शेलार म्हणाले होते.

खरंतर, शेलार यांच्या या उल्लेखाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. राज्यपालांनी फडणवीस यांना 30 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे. त्या आधी विधानसभेचं अधिवेशन बोलावून त्यात हंगामी अध्यक्षांची निवड करावी लागते. सभागृहातला सर्वात ज्येष्ठ आमदार यासाठी निवडला जातो. कोळंबकर हे सलग तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

वडाळा मतदारसंघातून ते सलग सात वेळा निवडून आले होते. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची आधी ओळख होती. नंतर कोळंबकर हे नारायण राणे यांच्यांसोबत काँग्रेसमध्ये गेले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांची फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यानुसार, विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाकरता भाजपने त्यांचं नाव पुढे केलं असल्याची चर्चा आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 25, 2019, 6:21 PM IST

ताज्या बातम्या