मुजीब शेख, नांदेड 10 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जिरगा गावात एका मोबाईलमुळे एका मुलाला आपली बोटं गमवावी लागती. हा आठ वर्षंचा मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता. तो खेळत असतानाच अचानक हा स्फोट झाला आणि त्याची बोटं फाटली गेली. मुलावर तातडीने उपचार करण्यात आल्याने त्याची बोटं गेली मात्र जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं.
मुखेड तालुक्यातील कमलातांडा जिरगा इथल्या श्रीपत जाधव या शेतकऱ्यांने टि.व्ही. वरची मोबाईलची जाहीरात पाहून ऑनलाईन मोबाईल मागवला. जाहीरातीमध्ये 1500 रुपयाला तीन मोबाईल त्यावर एक घडयाळ मोफत अशी ही जाहीरात होती. I KALL k72 या कंपनीची जाहीरात पाहून मोबाईलची मागणी केली, त्यांना तीन मोबाईल पैकी एक मोबाईल गेल्या एक ते दिड महिन्यापासून वापरात होता.
त्या मोबाईलवर त्यांचा मोठा मुलगा आठ वर्षीय प्रशांत हा नेहमीप्रमाणे गेम खेळत बसला असता अचानक मोबाईलचा मोठा स्फोट झाला यात ज्या डाव्या हातात मोबाईल होता त्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे उडून गेली. तळहात छिन्नविछिन्न झाला तर मोबाईलचे तुकडे छातीला, पोटाला लागुन तेथेही दुखापत झाली. सुदैव इतकंच की त्याचा जीव वाचला.
प्रशांतचा हात कायमचा निकामी झाल्याने त्याच्या कुटूंबियांवर संकट आलं आहे. त्या मुलाला बाऱ्हाळी येथिल डॉ. प्रविण गव्हाणे यांच्या हॉस्पीटल मध्ये प्राथमिक उपचारानंतर उदगीर येथिल खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. प्रशांतच्या भवितव्याचं काय होईल या काळजीने त्याच्या आईने चिंता व्यक्त केली आहे.