राणेंबाबत भाजपचं सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण !

राणेंबाबत भाजपचं सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण !

नारायण राणे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटून आले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाचा फेरा अजूनही सुटलेला दिसत नाही. राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपनं अजूनही स्पष्ट संकेत दिले नसल्याने राणे यांच नक्की काय होणार ? याबाबत प्रशचिन्ह कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राणेंबाबत भाजपने सध्यातरी वेट अॅन्ड वॉच अशीच काहिशी भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

मुंबई, नवीदिल्ली, 26 सप्टेंबर : नारायण राणे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटून आले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाचा फेरा अजूनही सुटलेला दिसत नाही. राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपनं अजूनही स्पष्ट संकेत दिले नसल्याने राणे यांच नक्की काय होणार ? याबाबत प्रशचिन्ह कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राणेंबाबत भाजपने सध्यातरी वेट अॅन्ड वॉच अशीच काहिशी भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.

नारायण राणेंनी काल भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिवशीच प्रस्तावित सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन निमंत्रणाचं निमित्त काढून दिल्ली गाठली तिथं आधी दानवे, चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. त्यानंतर दानवे आणि चंद्रकांत पाटील राणेंना घेऊन अमित शहांच्या निवासस्थानी गेले. पण हिशेबाला पक्के गुजराती असलेल्या अमित शहांनी राणेंना भेटण्याची अजिबात घाई केली नाही. राणेंना तास -दीडतास ताटकळत ठेवल्यानंतरच ते घरी गेले. पण या भेटीतही राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत कुठलीच ठोस चर्चा झाली नसल्याचं बोललं जातंय. साधारण 20-25 मिनिटे ही बैठक चालली. त्यानंतर राणे आणि अमित शहा हे दोघेही माध्यमांशी काहीच न बोलता मुंबईला रवाना झाले. तर दानवे आणि चंद्रकांत पाटलांनी एका सुरात सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज उद्घाटनाच्या निमंत्रणाचं कारण कॅमेरासमोर बोलताना ठोकून दिलं. बरं हे कारण खरं मानावं तर त्याचीही कुठलीच तारीख अमित शहांनी नारायण राणेंना दिलेली नाही. थोडक्यात कायतर भाजप राणेंना पक्षात घेण्याबाबत स्वतःहून कुठलीच उत्सुकता दाखवत नाहीये. कारण तसं केलं तर राणेंच्या अटी शर्ती मान्य कराव्या लागतील, हे त्यांना पक्कं माहिती आहे. म्हणूनच राणेंना पक्षात घ्यायचेच झालेतर त्यांनी भाजपच्या अटीशर्तींवर यावं, असाच त्याचा साधा सरळ अर्थ होतो.

बरं मुंबईत आल्यानंतरही अमित शहांनी राणेंच्या पक्ष प्रवेशाबाबत कोणतंही विधान केलं नाही. नाही म्हणायला ते संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना भेटले पण भय्याजी जोशींनीही राणेंना पक्षात घ्यायचं की नाही सर्वस्वी भाजपचा प्रश्न आहे. पण आमची संघटना ही शिस्त पाळणारी आहे. हे सांगायलाही ते विसरले नाहीत. याचाच अर्थ असा की नारायण राणेंना भाजपात यायचेच असेल तर त्यांनाही संघाची शिस्तही पाळावीच लागेल. पण राणेंच्या राजकारणाचा आजवरचा खाक्या पाहिला तर त्यांना स्वतःला संघाच्या शिस्तीत बसवून घेणं नक्कीच जड जाणार यात शंका नाही कारण काँग्रेसमध्ये 12 वर्षे काढूनही ते तिथल्या राजकीय संस्कृतीशी एकरूप होऊ शकलेले नाहीत. बरं हे कमी काय म्हणून राणेंच्या दोन्ही मुलांचं काय करायचं, हा देखील भाजपसमोरचा मोठा यक्ष प्रश्न आहे. कदाचित म्हणूनच राणेंच्या पक्ष प्रवेशाबाबत भाजपनेही काँग्रेस प्रमाणेच 'थंडा करके खाओ' ही राजनिती अवलंबली असल्याचं बोललं जातंय.

भाजपने समजा राणेंबाबत पुढचे काही दिवस हे असंच 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण अवलंबलं तर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. अशातच राणेंनी पुढच्या राजकीय वाटचालीचा निर्णय हा दसऱ्याआधीच जाहीर करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर करून टाकलंय. त्यामुळे भाजप प्रवेशाचं नक्की होण्याआधीच काँग्रेस सोडून मोकळे झालेले राणे दसऱ्याला नेमकी काय भूमिका जाहीर करणार हा खरंतर मोठा प्रश्नच आहे.

दरम्यान, भाजपातील खात्रीलायक सूत्रांनुसार मुख्यमंत्री राणेंना पक्षात घेण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत तर चंद्रकांत पाटील आणि नितीन गडकरी राणेंसाठी अनुकूल आहेत. पण आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन कोकणात शिवसेनेला काटशह देण्यासाठी मोदी-शहा ही जोडगोळी ऐनवेळी राणेंना भाजप प्रवेशाचा हिरवा कंदील दाखवूही शकते. पण तोपर्यंत नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते नेमकं काय करणार, हाच खरा प्रश्न आहे.

First published: September 26, 2017, 10:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading