गुढी पाडवा : हिंदू नववर्षाची कालगणना सुरू केली त्याच्याविषयीच्या 8 गोष्टी

गुढी पाडवा : हिंदू नववर्षाची कालगणना सुरू केली त्याच्याविषयीच्या 8 गोष्टी

आनंद, सुख घेऊन येणारा गुढी पाडवा आपण दरवर्षी न चुकता मोठ्या उत्साहानं साजरा करतो. गुढी पाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात इतकंच माहीत असतं. मात्र गुढी पाडव्याची सुरुवात कशी झाली. आपण हा सण का साजरा करतो हे जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 6 एप्रिल: चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढी पाडवा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवसापासून हिंदूंचं नववर्ष साजरं होतं हे आपल्याला माहिती आहे. सकाळपासून याविषयीचे शुभेच्छा संदेश एकमेकांना शेअर झाले असतील. पण कालगणना कुणी सुरू केली माहीत आहे का?  शालिवाहन शके नावाने ओळखली जाणारी ही कालगणना शालिवाहन राजाने सुरू केली.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून गुढी पाडवा ह्या सणाचं महत्त्व आहे. गुढी उभी करून गुढीची पूजा केली जाते. या दिवशी प्रसाद म्हणून कडुनिंबाची पानं खाण्याची प्रथा आहे.शालिवाहन किंवा सातवाहनाने ही कालगणना सुरू केली हे खरं. पण गुढी पाडवा कधीपासून साजरा केला जातो. त्यामागची कथा काय, शालिवाहनाने नेमक्या याच दिवशी काय केलं याविषयी इतिहासतज्ज्ञ आणि अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.

चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शालिवाहक शक ही नवीन कालगणना सुरू झाली. शालिवाहन म्हणजेच सातवाहन. सातवाहनाला संस्कृतमध्ये शालिवाहन म्हणतात. सातवाहनांचं साम्राज्य आताच्या दक्षिण भारताच्या बऱ्याच भागात होतं. गुढी पाडवा का साजरा करतात याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. याची सत्यासत्यता पडताळून पाहिलेली नाही.

 गुढी पाडव्याविषयीच्या 8 आख्यायिका

1 शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैनिक तयार करून त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण आणले. मातीच्या सैन्याच्या मदतीनं शालिवाहकाने शत्रूचा पराभव केला. या विजयप्रीत्यर्थ हा सण साजरा करतात.

2. शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव केला. अत्याचारी शकाच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. शकावर विजय मिळवलेल्या शालिवाहन राजाचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो.

3. सातवाहनांनी शकांच्या प्रदेशावर विजय मिळवाला आणि त्यांनंतर शालिवाहन शक कालगणना सुरू झाली. गौतमीपुत्राने प्रतिस्पर्धी शक शत्रप यांचा पराभव केला असंही सांगितलं जातं.

4. शालिवाहक राजाने इ.स. 78 मध्ये राजाचा पराभव केला तेव्हा हे संवत्सर सुरू झालं असंही सांगितलं जातं. परंतु हा संवत्सर कनिष्क राजाने सुरू केला असे बरेच विद्वान मानतात. पुढे त्याचे जे शक अधिकारी होते त्यांनी तो वापरला आणि म्हणून त्याला शक संवत्सर असं म्हटलं जातं.

5. शालिवाहनांनी शकांचा पराभव केल्यावर हा संवत्सर सुरू झाला किंबहुना तो सातवाहनांनीच सुरू केला असाही मतप्रवाह आहे. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर त्याचा मुलगा जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने स्वतःचा नवीन राज्यसंवत्सर सुरू केला.

6. वसू नावाच्या राजानं तपश्चर्या केली. त्यानंतर स्वर्गातील अमरेंद्राने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात असा मानस आहे.

7. श्रीरामाने या दिवशी वालीचा वध करून दक्षिणेतील प्रजेला वालीच्या जाचापासून मुक्त केलं. रामाच्या विजयाचं आणि प्रजेच्या आनंदाचं प्रतिक म्हणून घरोघरी विजयाची, आनंदाची गुढी उभी केली जाते.

8. पार्वती आणि शंंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात.

अशा आख्यायिका प्रसिद्ध आहेत मात्र गुढी पाडवा हा नूतनवर्ष, नवचैतन्य, आणि नव्या संकल्पानं घरोघरी दरवर्षी साजरा केला जातो.महराष्ट्रात हा सण 'गुढी पाडवा' नावाने तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये 'उगादी' या नावाने साजरा करतात.

 

VIDEO : नाशिकच्या माणसाचा सोनेरी सदरा, अंगावर तब्बल 9 कोटींचं सोनं!

First published: April 6, 2019, 7:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading