‘डोळ्यादेखत माझा कृष्णा गेला’, बुडणाऱ्या मुलाची वडिलांना घट्ट मिठी; आईच्या डोळ्यांना लागल्या धारा!

‘डोळ्यादेखत माझा कृष्णा गेला’, बुडणाऱ्या मुलाची वडिलांना घट्ट मिठी; आईच्या डोळ्यांना लागल्या धारा!

  • Share this:

मंचर 06 नोव्हेंबर: आपल्या कर्त्या मुलाने आता सगळं काम सांभाळावे आणि पुढे जावं असं सगळ्यांच पित्यांना वाटत असतं. पण मंचर जवळ राहणाऱ्या एका वडिलांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. विहिरीमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेणाऱ्या वडिलांना आपल्या मुलाला सगळे प्रयत्न करुनही वाचवता आलं नाही. मंचर जवळच्या गावडेवाडी इथली ही घटना आहे. डोळ्यासमोर मुलगा गेल्याने वडिलांना धक्का बसला तर कृष्णाच्या आईच्या डोळ्यांना लागलेल्या धारा अजुनही कमी झालेल्या नाहीत.

मुळचे मराठवाड्यातले सखाराम शेळके हे उदरनिर्वाहासाठी इथे आले होते.  शेतात मजुरी करून ते आपलं घर चालवतात. त्यांचा 18 वर्षांचा मुलगा कृष्णा हा विहिरीवर  पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेला होता. पाणी काढत असताना तो तोल जावून विहिरीत पडला आणि पुन्हा परत येवू शकला नाही.

50 फुट खोल असलेल्या विहिरीत भरपूर पाणी होतं. विहिरीजवळच खेळणाऱ्या काही मुलांनी कृष्णाच्या वडिलांना ही माहिती दिली. हातातली सगळी काम सोडून त्यांनी विहिरीजवळ धाव घेतली आणि खोल पाण्यात उडी टाकली. पाण्यात बुडणाऱ्या कृष्णाने वडिलांना घट्ट मिठी मारली. कृष्णाने मिठी मारल्यामुळे तेही पाण्यात बुडू लागले. मात्र त्याच वेळी त्यांच्या हाताला एक पाईप लागला. त्यांनी त्या पाईपला पकडले आणि दुसऱ्याच क्षणाला कृष्ण पुन्हा खोल पाण्यात गेला.

वडिल सखाराम हे त्याला वाचवू शकले नाही. आपल्या डोळ्यादेखत कर्ता मुलगा गेल्याने वडिलांवर आता दु:खाचा डोंगर कोसळलाय. कृष्णाला पोहणं येत नव्हतं त्यामुळे त्याचे पाण्याबाहेर येण्याचे सर्व प्रयत्न अपुरे पडले. तो धडपड करत होता. मात्र पाणी खोल असल्याने त्याचा काहीच आधार मिळाला नाही. माझा कृष्णा गेला म्हणत वडिलांनी हंबरडा फोडला तर कृष्णाच्या आईच्या डोळ्याचं पाणी अजुनही संपलं नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 6, 2020, 10:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या