भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन, पुण्यात सुरू होते उपचार

भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन, पुण्यात सुरू होते उपचार

गीता, उपनिषदे, संस्कृत वाङमय, इतिहास व सावरकर वांङ्गमय याचे ते गाढे अभ्यासक होते. रुक्मिणी मातेच्या मंदिरातले ते वंशपरंपरागत पुजारी होते.

  • Share this:

पंढरपूर 28 सप्टेंबर: वारकरी संप्रदायातले अग्रणी भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 80 वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना 14 सप्टेंबरला पुण्यात दाखल करण्यात आलं होतं. इथल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सुरू होते. मात्र वय जास असल्याने उपचारांना शरीर साथ देत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळत होती. रुक्मिणी मातेच्या मंदिरातले ते वंशपरंपरागत पुजारी होते.

उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचेही अभ्यासक होते. ते गेली 33 वर्ष पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चातुर्मासात भागवत कथा सांगितली होती. कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे संस्कृत, मराठी, इंग्रजी,  इतिहास या विषयाचे अध्यापन केले. त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्त झाल्यावर  संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह, प्रवचने दिलीत. पंढरपुरातील समाजकारण, राजकारणात त्यांचे मोलाचे योगदान होते. ते 25 वर्षे नगरसेवक आणि 2 वर्ष पंढरपूरचे नगराध्यक्षही होते.

गीता, उपनिषदे, संस्कृत वाङमय, इतिहास व सावरकर वांङ्गमय याचे  ते गाढे अभ्यासक होते. पंढरपूर येथे त्यांनी  सावरकरांचा 9 फुटी पूर्णाकृती पुतळा, 1 लाख पुस्तकांचे सावरकर वाचनालय आणि दीड कोटी खर्च करून सावरकर क्रांती मंदिर त्यांनी उभे केले होते.

त्यासाठी लागणारी सर्व रक्कम ही त्यांनी देणग्या आणि स्वतःच्या कीर्तन प्रवचन आणि व्याख्यानातून जमविली होती. त्यांनी आत्तापर्यंत 25 पुस्तके लिहिली आहेत.  त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. देवर्षी नारद पुरस्कार, महर्षी याज्ञवल्क्य पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, अलिकडेच मिळालेले नानासाहेब पेशवे पुरस्कार', लावणीचा रामजोशी पुरस्कार व सावरकर प्रतिष्ठान पुणे यांचा जीवनगौरव पुरस्कार अशा शेकडो पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 28, 2020, 5:53 PM IST

ताज्या बातम्या