कॉन्स्टेबलचा प्रताप, पोलीस गाडीत बसून केली बिअर पार्टी आणि Facebook Live

कॉन्स्टेबलचा प्रताप, पोलीस गाडीत बसून केली बिअर पार्टी आणि Facebook Live

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस व्यस्त असताना नियमांचं पालन न करता अशी पार्टी करणं आणि तेही विभागाच्या गाडीमध्ये हे अत्यंत आक्षेपार्ह मानलं जात आहे.

  • Share this:

सोलापूर 08 एप्रिल : एकीकडे लॉकडाऊनमुळे तळीरामांनी वाईन शॉप फोडल्याची घटना ताजी असतानाच आता चक्क पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या शासकीय गाडीतच मित्रासह बिअर आणि बिर्याणी पार्टी केल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे, यातील पोलीस मित्रानेच ही पार्टी फेसबूकवरुन लाईव्ह केलीय. त्यामुळे सोलापूर शहरात मोठी खळबळ माजलीय.

देशात लॉकडाऊन आणि कर्फ्यू असतानाही सोलापूर शहर पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागातील कर्मचारी विनोद दंतकाळे याने मात्र मोठा प्रताप केल्याचे समोर आलेय. याप्रकरणी कॉन्स्टेबल विनोद दंतकाळेसह त्याच्या तीन मित्रांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये मित्र केतन कसबे, राहुल शिंदे, सुमेध वाघमारे यांचा समावेश आहे.

कॉन्स्टेबल दंतकाळे हे ६ एप्रिल रोजी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये शासकीय वाहनावर सेवेत होते. त्यानंतर त्यांनी शासकीय वाहन आपल्या हद्दीबाहेर नेत आपल्या मित्रासह बिअर आणि बिर्याणी पार्टी केली. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता त्यातील केतन कसबे नामक मित्राने ही सर्व पार्टी फेसबूक द्वारे लाईव्ह केलीय. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय.

दरम्यान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हा प्रकार समोर येताच आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विनोद दंतकाळेचे निलंबन करण्याचे आदेश दिलेत. तसेच शासकीय वाहनाचा गैरवापर केल्यामुळे सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचा पुढील तपास जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे. एन. मोगल करीत आहेत.

कोरोना बाधितांची संख्या वाढली

कोरोनाचा देशातला प्रसार वाढतोच आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत भरच पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 773 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 32 जणांचा मृत्यू झालाय.

हे वाचा - PM पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलणार; 11 तारखेला होणार मोठा निर्णय

त्यामुळे देशभरातल्या मृत्यू झालेल्यांची संख्या 149 झाली आहे. तर कोरोना बाधितांची संख्या 5119वर गेलीय. आत्तापर्यंत 402 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

Hydroxychloroquine या औषधाचा भविष्यात तुटवडा राहणार नाही याची काळजी सरकार घेईल असंही अग्रवाल यांनी सांगितलं.

हे वाचा - कोरोनाचा वेग थांबेना, गेल्या 24 तासांमध्ये 773 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आज संवाद साधला. पंतप्रधानांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आणि त्यांचीही मतं ऐकून घेतली. कोरोनाला आटोक्यात आणायचं असेल तर लॉकडाऊन वाढविण्यात यावा असं मत सर्वच नेत्यांनी व्यक्त केलं.

First published: April 8, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या