• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नाशकात कोरोनाचा धक्कादायक प्रसार; दाहकता वाढली, परंतु नेमकं चुकतंय कुठे?

नाशकात कोरोनाचा धक्कादायक प्रसार; दाहकता वाढली, परंतु नेमकं चुकतंय कुठे?

पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आणि कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या नाशिक जिल्ह्यात झपाट्यानं प्रादुर्भाव वाढू लागला.

  • Share this:
नाशिक, 15 मार्च : पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आणि कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या नाशिक जिल्ह्यात झपाट्यानं प्रादुर्भाव वाढू लागला. आता सगळंच सामान्य झालंय या भ्रमात काहीशा शिथिल झालेल्या प्रशासनाला मोठी चपराक तर बसलीच पण यापेक्षा अधिक जबाबदार असलेल्या सर्वसामान्य नागरीकांना हा मोठा धक्का आहे. 'मास्क वापरा ...नाहीतर कारवाईला सामोरं जा', 'सॅनिटायझरचा नियमित वापर करा ... नाहीतर कारवाईला सामोरं जा', 'सोशल डिस्टनसिंग पाळा... नाहीतर कारवाईला सामोरं जा'; असा इशारा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे. मात्र इशाऱ्यात दिलेली अधिकाऱ्यांची कारवाईची भाषा ही फक्त कागदावरच राहिली आहे. सर्वसामान्य नागरीकांनी तर कोरोनाला अक्षरशः झुगारून दिल्याचं दिसून येत आहे. याच काळात अनेक विवाहसमारंभ झाले. याच कार्यात प्रचंड गर्दी, नाशिककरांनी बघितली. चक्क राज्यातील बडे नेते, मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांची खुलेआम उपस्थिती, अवघ्या नाशिकनं पहिली. दरम्यान, कडक लॉकडाऊन काळात जवळपास प्रत्येकाचं आर्थिक नियोजन कोलमडलं होतं. ज्यांचं पोट हातावर आहे, त्यांना तर आपलं घर चालवणही अवघड झालं होतं. याचमुळं परिस्थिती शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळे कामाला लागले आहेत. हे ही वाचा-मोठी बातमी! पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये 31 मार्चपर्यंत शाळा बंद साहजिकच कोरोनाची भीती झुगारून आपली आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी पुनश्च हरिओम म्हणत पून्हा एकदा बाजारपेठा, मार्केट, रस्ते गजबजून गेले. आपल्याच नकळत आपण पून्हा एकदा कोरोनाला आमंत्रण देतोय, याची साधी जाणीवही कोणाला नव्हती. जेव्हा कोरोनानं डोकं वर काढलं तेव्हाच आपल्याच चुकांची जाणीव प्रशासनासह सगळ्यांनाच झाली आहे. झपाट्यानं प्रादुर्भाव वाढला. रुग्णसंख्येत सध्या दररोज धक्कादायक वाढ होतेय, बळींची संख्याही वाढतेय. नाशिक शहर तर हॉटस्पॉट कायम आहे. एकीकडे सुरू असलेलं लसीकरण तर दुसरीकडे वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खडबडून जागी झालेली प्रशासकीय यंत्रणा जोमानं कामाला लागली असली तरी जोपर्यंत लोकसहभाग अर्थात तुमचा-आमचा प्रतिसाद गांभीर्यानं मिळत नाही तोपर्यंत, हे चित्र बदलणार नाही हेच खरं.
Published by:Akshay Shitole
First published: