हरीष दिमोटे, शिर्डी 12 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून शिवसेनेने राज्यसभेत काँग्रेसला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेवर नाराज आहे. या नाराजीचा परिणाम महाराष्ट्र सरकारवर होणार का? याची चर्चा आता सुरू झालीय. लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेत शिवसेना विरोध करेल असंही जाहीर केलं होतं. मात्र मतदानाच्या वेळी शिवसेनेने सभात्याग केल्याने त्याचा फायदा केंद्र सरकारला झाला. त्यामुळे काँग्रेस दुखावली गेलीय. महाराष्ट्रात नवं सरकार येऊन अजुन एक महिनाही झाला नाही. त्यामुळे सुरुवातीलाच सरकार अडचणीत येणार का? असाही प्रश्न विचारला जातोय. त्यावर काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्तर देत खुलासा केलाय.
'पक्ष माझ्या बापाचा, मी कुठेही जाणार नाही', पंकजा मुंडे गरजल्या!
ते म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाला तो दिवस देशासाठी सर्वात काळा दिवस आहे. शिवसेनेन पाठींबा दिला नाही. त्यांनी दिला असता तर चांगलं झालं असतं. मात्र आमचा राज्याच्या विकासावर भर आहे त्यावर परिणाम होणार नाही. जे सरकार टिकणार नाही याच्या वावडया उठवतात ते अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. मुंगेरीलाल के हसिन सपने जे बघतायत त्यांनी ते बघावेत.
खातेवाटप व्यवस्थित होणार आहे आणि सरकारही पाच वर्ष टिकणार आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्री मंडळातील समावेशाबाबत हायकमांड निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं. या राज्याची भाजपने वाट लावली. राज्यावर बेसुमार कर्ज वाढवल. यांनी केलेला प्रकार म्हणजे कर्ज घेऊन बायकोला दागिणे घेण्यासारखा आहे. उत्पन्न न वाढवता श्रीमंती दाखवण्यासारखं आहे. आयजीच्या जिवावर बायजी उदार अशी भाजपची अवस्था होती.
राज्यसभेत काय झालं?
अमित शहांनी विधेयक मांडल्यानंतर त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रश्नावरून मोदी सरकारवर प्रचंड हल्लाबोल केला. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, कपील सिब्बल आणि पी. चिदंबरम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना तुमच्या देशभक्तीचं प्रमाणपत्र आम्हाला नको असं सांगितलं. या सगळ्या प्रश्नांना अमित शहा यांनी शेवटी सडेतोड उत्तर दिलं. या बिलावरून काँग्रेस आणि काही पक्ष संभ्रम निर्माण करून मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण केली जात असल्याचा पलटवार त्यांनी काँग्रेसवर केला. तर एका रात्रीत भूमिका का बदलली असा सवाल करत त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vijay wadettiwar