सत्तेसाठी वेळकाढू शिवसेनेला चपराक! इथे मिळतेय 10 रुपयांत पोटभर जेवण

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 10 रुपयांत तर कोणी पाच रुपयांत जेवण थाळीचे आश्वासन दिले होते.

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 09:07 AM IST

सत्तेसाठी वेळकाढू शिवसेनेला चपराक! इथे मिळतेय 10 रुपयांत पोटभर जेवण

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,6 नोव्हेंबर: विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 10 रुपयांत तर कोणी पाच रुपयांत जेवण थाळीचे आश्वासन दिले होते. निवडणूक निकाल लागून आता 14 दिवस उलटले पण, सरकारच अस्तित्वात न आल्याने ही स्वस्तातली थाळी कधी नशिबात येणार हा प्रश्न आहे. मात्र, सत्तेसाठी वेळकाढू शिवसेनेला नगर शहरात ज्येष्ठांनी चपराक लगावली आहे.

एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या संवेदनशील ज्येष्ठांनी गरजू, सामान्य कष्टकरी नागरिकांना दहा रुपयांत पोटभर जेवणाची थाळी सुरू केली आहे. नगर शहरातील हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठानच्या हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स ग्रुप मार्फत दहा रुपयांत पोटभर जेवण देणारे 'अन्नछत्र' सुरू करण्यात आले आहे. नगरमधील संवेदनशील व्यापारी, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे.

शहरातील प्रेमदान चौकातील नोबल हॉस्पिटल परिसरात हनुमान हिंदसेवा प्रतिष्ठान संचलित हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स ग्रुपचा अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण देणारा उपक्रम सुरू झाला आहे. याभागात अनेक हॉस्पिटल्स असून जिल्हाभरातून पेशंट आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. तसेच औद्योगिक वसाहतीत काम करणारा कामगार वर्ग, रिक्षाचालक आदींचे वास्तव्य याभागात आहे. या सर्वांसाठी हे दहा रुपयांतील पोटभर जेवण खऱ्या अर्थाने हेलपिंग हॅन्ड ठरला आहे. या उपक्रमासाठी राजेंद्र मालू यांनी स्वत:ची जागा देऊन तिथे पत्र्याचे मजबूत शेडही उभारून दिले आहे. ग्रुपचे सदस्य वर्गणी जमा करून रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणतात. येथे चांगल्या प्रतीचा तांदळाचा गरमागरम भात व चविष्ट सांबार तयार केले जाते. स्वच्छ प्लेटमध्ये ते सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. लोकांना आरामशीर भोजन घेता येण्यासाठी येथे उंच टेबलचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याचे शुद्ध पाणीही सर्वांना उपलब्ध असते. शनिवार वगळता आठवडाभर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हा उपक्रम सुरू असतो. यासाठी राजेंद्र मालू, महावीर कांकरिया, संगीता भोरे, संजय खोंडे, बाळासाहेब भोरे, श्रीनिवास खुडे, नंदेश शिंदे, किशोर कुलकर्णी, अपर्णा खुडे यांच्यासह अनेक जण स्वयंस्फूर्तीने मदत करतात. प्रत्येक जण वेळ मिळेल त्याप्रमाणे या केंद्रावर येऊन जबाबदारी सांभाळत असतो. सामान्यांसाठी सरकार अनेक उपाययोजना घोषित करत असते. निवडणूक जाहीरनाम्यात तर असंख्य योजनांचा पाऊस पाडण्यात येत असतो, पण या सरकारी योजना किती वास्तवात येतात किंवा किती यशस्वी होतात हा संशोधनाचा भाग असला तरी सेवाभावी वृत्तीने ठरवल्यास आपण सरकारला पण लाजवेल, असे काम कृतीतून करू शकतो हेच हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठानने करून दाखवले आहे.

VIDEO : आठवलेंनी घेतली नितीन गडकरींची भेट, केली 'ही' मागणी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 09:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...