Home /News /maharashtra /

या खेकड्याच्या नांग्या ठेचा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी

या खेकड्याच्या नांग्या ठेचा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी

तानाजी सावंत यांच्याविरोधात कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

उस्मानाबाद 09 जानेवारी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकींमध्ये राज्यात अनेक ठिकाणी फाटाफुटीचं राजकारण झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली. मात्र काही ठिकाणी शिवसेनेतल्या नाराजांनी भाजपला साथ देत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला अशा नेत्यांविरुद्ध आता शिवसैनिकांनी एल्गार पुकारलाय. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजपला साथ देणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पोष्टर्स लावले आहेत. त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय. शिवसेना आमदार तानाजी सावंतांविरोधात सोलापूर शहरात बॅनरबाजी बघायला मिळाली. खेकड्याच्या चित्रात तानाजी सावंतांचा चेहरा दाखवत विरोध व्यक्त करण्यात आलाय. हा खेकडा सोलापूर आणि धाराशिवची शिवसेना पोखरतोय, याच्या नांग्या वेळीच ठेचा अशी मागणी करण्यात आलीय. शहरातील बॅनरबाजीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण. मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या भावाला निवडून आणण्यासाठी भाजपला साथ देत सत्ता राखली. या पोष्टरबाजीमुळे शिवसेनेतले अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. तानाजी सावंत यांच्याविरोधात कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उस्मानाबाद जिप निवडणुकीत काय झालं? मंगळवारी झालेल्या उस्मानाबाद जिल्हापरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकडे सगळ्यांचं लक्षं लागलं होतं. शिवसेना उपनेते आ.तानाजी सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने शिवसेनेला धक्का बसलाय. सावंत यांनी भाजपचे नेते आ. राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा युतीचा झेंडा रोवला होता. राज्यात महविकास आघाडीचा बोलबाला असला तरी उस्मानाबाद जिल्हापरिषदेत नाट्यमय घडामोडी घडवत ही जिल्हा परिषद भाजपा शिवसेना यांनी ताब्यात घेतलीय. भगवान गडावर पोहोचताच धनंजय मुंडेंचा पंकजा ताईंना टोला, म्हणाले... राज्यात भाजपा शी फारकत घेत शिवसेनेने काँग्रेस राषट्रवादी सोबत घरोबा करत उद्धव ठाकरें नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले हाच फॉर्म्युला राज्यात सगळीकडे वापरत बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उपनेते आ. तानाजी सावंत यांनी आपले समर्थक सदस्य व पुतणे धनंजय सावंत यांना भाजपबरोबर पाठवून महाविकास आघाडीला धक्का दिलाय. तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्याने उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य नाराज होते व त्यांनी भाजपबरोबर जिल्ह्यात युती करण्याचा आग्रह धरला व त्याला होकार देत तानाजी सावंत यांनी आपला पुतण्या भाजपच्या मदतीने थेट उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवला. त्यात त्यांना उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची साथ मिळाली. आम्ही बंडखोरी केली नसून ज्ञानराज चौगुले, सुजितसिंह ठाकूर , राणाजगजितसिंह व तानाजी सावंत हे विकास करू शकतात या विकासालाच लक्ष ठेवून आम्ही युती केली असल्याचे धनंजय सावंत सांगत आहेत. राज ठाकरेंसोबत भेटच झाली नाही, देवेंद्र फडणवीसांनी केला 'मनसे' दावा आतापर्यंत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे 26 सदस्य व भाजपाचे 4 सदस्य घेऊन राणा पाटलांनी कारभार हाकला पण राणा पाटील यांचा भाजप प्रवेश झाला व जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली राष्ट्रवादीतील 26 पैकी 16 सदस्य हे राणा पाटील समर्थक आहेत याच्या जोरावर राणा पाटील यांनी ही जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले त्यांना तानाजी सावंत, सुजित ठाकूर ज्ञानराज चौगुले व अपक्ष व काँग्रेसचे तीन सदस्यांची साथ मिळाली त्यावरून त्यांनी आपल्या समर्थक राष्ट्रवादीच्या सदस्य अस्मिता कांबळे यांना अध्यक्षपदी बसवले आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Shivsena, Solapur election

पुढील बातम्या