विठ्ठलाच्या पंढरपुरात 'मोबाइल गॅंग',पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केले 55 महागडे हॅन्डसेट

विठ्ठलाच्या पंढरपुरात 'मोबाइल गॅंग',पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केले 55 महागडे हॅन्डसेट

विठ्ठलाच्या पंढरपुरात पोलिसांनी 'मोबाइल चोर गॅंग' पर्दाफाश केला आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,19 डिसेंबर:देशभरातील कोट्यावधी भाविकांचे आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपुरात पोलिसांनी 'मोबाइल चोर गॅंग' पर्दाफाश केला आहे. पंढरपूर शहरातील नागरिक आणि दर्शनास आलेल्या भाविकांचे मोबाइल संधी साधून चोरणाऱ्या टोळीला पंढरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. चोरट्यांकडून विविध कंपनीचे महागडे एकूण 55 मोबाइल हॅन्डसेट पोलिसांनी जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंढरपूर शहरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनास आलेल्या भाविकांचे मोबाइल चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत पंढरपूर शहर पोलिस स्टेशनला तक्रारीची रांग लागलेली असायची. पण हे मोबाइल कोण चोरतोय आणि कधी याचा तपास अनेक दिवस लागत नव्हता.

पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मोबाइल चोरी करणारी टोळीच पंढरपूरात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी पाळत ठेऊन गणेश क्षीरसागर, सूरज ससाणे आणि एक अल्पवयीन आरोपी अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी चोरीचा गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडे विविध कंपनीचे 55 महागडे मोबाइल हॅन्डसेट जप्त करण्यात आले. पंढरपूरात आलेल्या भाविकांना हेरून त्यांच्या नकळत मोबाइल चोरत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या तिघांना अटक केली असून या चोरांकडून ज्यांनी मोबाइल खरेदी केले, अशा ग्राहकांचा शोध घेऊन त्यांना सुद्धा अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक डाॅ.सागर कवडे यांनी सांगितले.

पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय

विठ्ठल मंदिरात दररोज भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र, याच विठ्ठल मंदिरात भाविकांसाठी मोबाइल बंदी घेण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. हा निर्णय 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. मंदिरात मोबाइल नेण्यास बंदी घातल्याने आता यावरुन नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विठुमाऊलीच्या दर्शनासाठी आलेले भक्त हे विठुरायासमोर फोटो काढतात आणि त्यामुळेच मंदिरात मोबाइल बंदी करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. यापूर्वी सुद्धा सुरक्षेचं कारण सांगत मंदिर प्रशासनाने मंदिरात मोबाइल बंदी केली होती. यामुळे भाविकांना आपले मोबाइल हे मंदिराबाहेर लॉकरमध्ये पैसे देऊन ठेवावे लागत होते. यानंतर भाविकांनी तसेच वारकऱ्यांनी मंदिर समितीच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला. अखेर मंदिर प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला होता. पण आता पुन्हा मोबाइल बंदी केल्याने यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2019 08:40 PM IST

ताज्या बातम्या