पुणे, 6 मार्च : पुण्यातील जागतिक आकर्षण केंद्र असलेल्या ओशो आश्रमानं (Osho International Meditation Resort) भूखंड विकण्याची तयारी सुरु केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात हा आश्रम असून याची मालकी झुरीचमधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनकडे (Osho International Foundation) आहे. या आश्रमातील दोन भूखंड विकण्याची तयारी सध्या सुरु असून त्याची किंमत 107 कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या वृत्तानुसार ओशो रजनीश यांनी स्थापन केलेल्या या आश्रमातील ध्यान केंद्र कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये बंद करण्यात आले आहे. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या या आश्रमात जगभरातील श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती ध्यान आणि योग करण्यासाठी येतात. मात्र, कोरोना काळात हे ध्यानकेंद्र बंद करण्यात आलं. आश्रमातील आर्थिक चणचण वाढली आहे.
या आश्रमातील 1.5 एकर जागेचे दोन भूखंड (Plots) विकण्याचा निर्णय फाऊंडेशननं घेतला आहे. ज्यामध्ये एक जलतरण तलाव (Swimming Pool) आणि एका टेनिस कोर्टाचाही समावेश आहे. हे दोन्ही प्लॉट बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांना विकण्याचा निर्णय फाऊंडेशननं घेतला आहे. बजाच यांचा ओशो आश्रमाला लागूनच बंगला आहे.
ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन (OIF) एक धर्मदाय संस्था (Charitable Trust) आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईतील धर्मादाय आयुक्तांना जानेवारी महिन्यात निवेदन दिले असून त्यामध्ये हे भूखंड विकण्याबाबत परवानगी मागण्यात आली आहे.
( ..तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची ठाम भूमिका )
ओशोंच्या भक्तांचा विरोध
ओशो भक्तांची संघटना असलेल्या ओशो फ्रेंडस फाऊंडेशनने ( Osho Friends’ Foundation) या विक्रीला विरोध केला आहे. या विक्री प्रक्रियेतील 50 कोटींचा व्यवहार यापूर्वीच झाल्याचा दावा या फाऊंडेशनच्या योगेश ठक्कर यांनी केला आहे. आमच्या तक्रारीवर धर्मदाय आयुक्त 15 मार्च रोजी सुनावणी करणार असल्याची माहिती ठक्कर यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.