उदयनराजे भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला पुन्हा धक्का?

उदयनराजे भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला पुन्हा धक्का?

उदयनराजेंनी राजीनामा दिल्यास महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक होऊ शकते. त्यामुळे लोकांशी प्रतारणा केली असा आरोपही करता येणार नाही.

  • Share this:

मुंबई 20 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटले. पूरग्रस्त भागातल्या मदत आणि पुनर्वसन कार्याला वेग देण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती असली तरी सध्याचं राजकारण बघता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात गोळा आलाय. राष्ट्रवादीतून अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या वळचणीला जात असल्याने राष्ट्रवादीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. त्यामुळे उदयन राजे यांच्या भेटीने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलंय. उदयन राजे यांना भाजपने याआधीच ऑफर दिली होती. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय.

सातारा ही राष्ट्रवादीची हक्काची जागा समजली जाते. कारण उदयन राजे भोसले यांचा करिष्मा या भागात आहे. राजे राष्ट्रवादीत असले तरी त्यांचा सर्वच नेत्यांमध्ये मुक्त वावर असतो. आणि सर्वच पक्षांचे नेतेही त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वावर भाळलेले असतात. राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांसोबत त्यांचं पटत नाही. त्यामुळे ते पक्षाच्या व्यासपीठावर फारसे दिसत नाहीत.

तर ही मुख्यमंत्र्यांसोबत झालेली भेट ही पुरग्रस्तांसाठी होती असं उदयराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते म्हणातात, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणेबाबत तसेच लवकरात लवकर त्या ठिकाणचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली.

लोकसभेच्या निवडणुकीच्या काळातच राजे हे भाजपवासी होणार असल्याची चर्चा होती. मात्र शरद पवारांनी त्यांची समजूत काढून त्यांना रोखून धरलं होतं. मात्र आता राष्ट्रवादीला गळती लागल्याने राजे वेगळा विचार करत असल्याचं बोललं जातंय. साताऱ्यातून राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. उदयनराजे भोसले यांचे चुलत भाऊ आणि राजकीय विरोधक शिवेंद्रराजेंनी याआधीच भाज पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजप उदयनराजेंनाही पक्षात घेणार का याचाही चर्चा सुरू झालीय.

उदयनराजेंनी राजीनामा दिल्यास महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक होऊ शकते. त्यामुळे लोकांशी प्रतारणा केली असा आरोपही करता येणार नाही असाही विचार आहे.

छगन भुजबळही राष्ट्रवादीची साथ सोडणार?

काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीत भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात आहे.

भुजबळांना तातडीने बोलावले..

काँग्रेस-राष्ट्रवादीने या पार्श्वभूमीवर मुंबईत संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी भुजबळ यांना तातडीने बोलावण्यात आले आहे. मतदारसंघाचा दौरा अर्धवट सोडून भुजबळ मुंबईला रवाना झाले आहे. येवल्यातील विसापूर येथे भुजबळ मंगळवारी दौऱ्यावर होते. भुजबळ सेनेत गेल्यास नाशिक जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल घडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर मात्र भुजबळ यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 09:47 PM IST

ताज्या बातम्या