सांगली 18 ऑक्टोबर: आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील हे भावूक झाले. शिवाय त्यांना बोलताना अश्रूही अनावर झाल्याचं रविवारी पाहायला मिळालं. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात गेले होते. यावेळी बोलताना त्यांना गहिवरून आणि त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित राहिले होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि काही काळासाठी जयंत पाटील स्तब्ध झाले.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तीच लोकं जेव्हा अकाली निघून जातात तेव्हा खूप दुःख होती अशी वेदना त्यांनी बोलून दाखवली.
कोरोनामुळे जगभरात अनेक माणसं दगावली आहे. भारतातही अनेकांचे निधन झाले आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जाणत्या लोकांचा या काळात मृत्यू झाला.
सांगली : जवळच्या सहकाऱ्याचे अकाली निधन झाल्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गहिवरले. अस्थी विसर्जन कार्यक्रमात बोलताना पाटील यांना अश्रू अनावर झाले. pic.twitter.com/VnQ5GiwRW3
— News18Lokmat (@News18lokmat) October 18, 2020
कोरोनाचं संकट आणि त्यात जबाबदारी योग्यपणे सांभाळणाऱ्या सहकाऱ्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाल्याचंही पाटील यांनी सांगितलं. त्यांच्याबद्दल बोलतांना त्यांना शब्दच फुटत नव्हते. शेवटी श्रद्धांजली वाहून त्यांनी कातरलेल्या स्वरात आपलं बोलणं संपवलं. त्यावेळी उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.