कोल्हापूरमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी सरसावल्या 2 मुली, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उभं राहून दिला संदेश

कोल्हापूरमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी सरसावल्या 2 मुली, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उभं राहून दिला संदेश

पर्यावरणासाठी कोल्हापूरमध्ये दोन मुली पुढे सरसावल्या आहेत. यातील एक इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे तर दुसरी सहावीची.

  • Share this:

कोल्हापूर, 5 सप्टेंबर : पर्यावरणासाठी राज्य आणि केंद्र सरकारसोबत आजही अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत, पण आता याच पर्यावरणासाठी कोल्हापूरमध्ये दोन मुली पुढे सरसावल्या आहेत. यातील एक इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे तर दुसरी सहावीची. कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट बाहेरच दोन सायकल्स आणि हातामध्ये फलक घेवून त्या दोघी गेल्या महिनाभरापासून दररोज एक तास या कार्यालयाजवळ येतात आणि उभ्या राहतात. 'पर्यावरण जपा , आमच्यासोबत या...', असा संदेश या फलकावर लिहिलेला आहे.

शहरातील या परिसरात येणारे जाणारे अनेक जण या दोघींकडे पाहतात, चौकशी करतात आणि निघून जातात. आतापर्यंत या दोघींना कुणीही जॉईन झालेलं नाही. पण तरीही दररोज एक तास या दोघी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असे फलक घेऊन उभ्या राहतात.

पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना निदान आम्ही खारीचा वाटा उचलू शकतो अशी आशा या दोघींनाही आहे.

त्यामुळे एकीकडे शाळेत शिक्षण घेत असतानाच पर्यावरणासाठी या दोघींनी जी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला आहे तो प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. कोल्हापूरचा विचार केला तर पंचगंगा नदी,आणि कचऱ्याची मोठी समस्या कायम आहे, तसेच इचलकरंजी शहरालाही प्रदूषणाचा मोठा विळखा आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील या मुलींचं कौतुक करावं तितकं कमीच असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: September 5, 2020, 6:40 PM IST

ताज्या बातम्या