शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने पोलिसांशी घातली हुज्जत, केली 'ही' मागणी

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने पोलिसांशी घातली हुज्जत, केली 'ही' मागणी

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात मतदानला लागले गालबोट...

  • Share this:

सोलापूर,21 ऑक्टोबर: करमाळ्यात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांनी थेट पोलिस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. मतदानादरम्यान करमाळ्यात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. दुपारी आमदार नारायण पाटील आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेनंतर करमाळ्यात तणाव वाढला आहे. खबरदारी म्हणून करमाळा शहर आणि तालुक्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार संजय शिंदे यांची निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी नारायण पाटील केली आहे.

राज्यभरात सोमवारी विधानसभेसाठी मतदान होते आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात मतदानला गालबोट लागले. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना बेज मारहाण केली. या मारहाणीत नारायण पाटलांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बाळु जगताप, बापुराव जगताप, संतोष देवकर, पिंटु जगताप, औंदुबर खोचरे, गणेश जगताप,अनिल जगताप, सुभाष जगताप या कार्यकर्त्यांना जबर मारहाण व चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. जखमींवर टेंभुर्णी येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मतदान केंद्रावरच भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

दुसरीकडे, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जामखेड येथील मतदान केंद्र क्रमांक 5 आणि 6 वर भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन गटात भांडण झाले. काही क्षणातच या भांडणाचे पर्यवसन हाणामारीत झाले. मतदान सुरू असतानाच ही घटना घडली. या हाणामारीत राष्ट्रवादीच्या पोलिंग एजंटला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत जामखेड गावच्या उपसरपंचासह 2 पोलिंग एजंट गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी अंबड येथील रुग्णालयात हलवन्यात आलंय. आपसातले राजकीय वाद असल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. मतदान करताना काही शुल्लक कारणांवरून कार्यकर्त्यांनी एकमेकांना डिवचलं होतं. त्यानंतर हे भांडण झालं. त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता. नंतर पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवलं.

मोर्शीत उमेदवारावरच हल्ला

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघात कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी धनोडी वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला चढवला. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची कार मात्र पूर्णतः जळून राख झाली आहे. या घटनेनंतर भुयार यांच्या कार्यकाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. रक्तदाब कमी झाल्याने भुयार यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन देवेंद्र भुयार यांची भेट घेऊन चौकशी केली. वाहनावर हल्ला करून कार जाळण्यात आल्याची कबुली खुद्द पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. देवेंद्र भुयार यांचा वाहन चालक व एका साथीदाराला वरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोर्शी मतदार संघात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 04:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading