संदीप राजगोळकर 5 सप्टेंबर : महाराष्ट्रातल्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसं अनेक भागांमध्ये राजकीय आखाड्यातलं चित्र स्पष्ट होत आहेत. अजुन निवडणूक तारखांची घोषणाही झालेली नाही मात्र कोल्हापूरात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दक्षिण कोल्हापुरातल्या उमेदवाराची घोषणाही करून टाकली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपने अमल महाडीक यांना तिकीट दिलं होतं. आणि हेवीवेट समजले जाणारे सतेज पाटील यांचा भाजपच्या लाटेत पराभव झाला होता. सतेज पाटील यांना हा पराभव जिव्हारी लागला होता.
त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सतेज पाटील यांनी कंबर कसलीय. आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी दक्षिण कोल्हापुरातून काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणाही करून टाकली. सतेज यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील असं त्यांनी जाहीर केलं. सतेज पाटील यांच्या या घोषणेमुळं कोल्हापूरात पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाडीक असा सामना रंगणार आहे.
नांदेडमध्ये 9 जगांसाठी 100 अर्ज; पण नोकरीसाठी नाही तर...
ऋतुराज हे सध्या राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र त्यांच्या उमेदवारीने डी वाय पाटील घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात उतरणार असून कोल्हापूरचा सामना आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील हे नाराज होते. ते शिवसेनेत जातील अशीही चर्चा होती. मात्र नंतर सर्व प्रकरण शांत झालं.
मदान राज्याचे नव्ये निवडणूक आयुक्त
राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला. प्रशासनात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. आता काही महिन्यांवर राज्यातल्या निवडणुका आल्या आहेत. काही दिवसांमध्येच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभीवर निवडणुकीची सर्व जबाबदारी आता मदान यांच्यावर असणार आहे.
मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते.