आघाडीत बिघाडी.. या मतदार संघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दोघांनाही उमेदवारी

आघाडीत बिघाडी.. या मतदार संघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दोघांनाही उमेदवारी

कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून कॉंग्रेस नेत्यांनीही पंढरपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,5 ऑक्टोबर: पंढरपूरच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून कॉंग्रेस नेत्यांनीही पंढरपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येथील जागेरून निवडणूक प्रचारापूर्वीच दोन्ही कॉंग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे.

दरम्यान कॉंग्रेस कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही, अशी भूमिका जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे पंढरपुरात आघाडीतील बिघाडी महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात यावर्षी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार सुधाकर परिचारकांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंगत आली आहे. महायुतीने राजकारणातील मुरब्बी सुधाकर परिचारकांना उमेदवारी देत विरोधी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. परिचारकांच्या विरोधात कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार भारत भालकेंना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्या जागेवर उमेदवारी जाहीर केल्याने कॉंग्रेसनेही शह देत जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजी काळुंगे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. पंढरपुरात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आपले उमेदवार दिल्याने येथील निवडणुकीत ट्विस्ट आणखी वाढले आहे. राज्यात कॉंग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी असतानाच सोलापूर जिल्हयातील पंढरपूर, सांगोला आणि सोलापूर मध्य या तीन विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने कॉंग्रेस आणि शेकाप उमेदवाराविरोधात बंड पुकारले आहे. अशातच पंढरपूरमधून कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस आपली उमेदवारी मागे घेणार नाही, अशी भूमिका कॉंग्रेस उमेदवारासह जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आणखी काय घडामोडी घडतात याकडेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे लक्ष लागल आहे.

VIDEO:राज्याचा मुख्यमंत्री हा मराठा असावा, मराठा क्रांती मोर्च्याची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2019 08:16 PM IST

ताज्या बातम्या