'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांची पवारांच्या 'पिच'वर जोरदार टोलेबाजी

'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांची पवारांच्या 'पिच'वर जोरदार टोलेबाजी

बरं झाले त्यांनी अजित पवारांना पाणी मागितले नाही, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी 'त्या' वादग्रस्त वक्तव्याची आठवण सगळ्यांना करून दिली.

  • Share this:

जितेंद्र जाधव,(प्रतिनिधी)

बारामती,17 ऑक्टोबर:भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. 50 वर्षांपासून बारामतीची सत्ता असून देखील त्यांना दुष्काळी भागात थेंबभर पाणी देता आले नाही. बरं झाले त्यांनी अजित पवारांना पाणी मागितले नाही,असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याची आठवण सगळ्यांना करून दिली.

मुख्यमंत्र्यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव येथे सभा घेत शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. बारामतीत आता यापुढील काळात दहशत चालणार नाही, लोकशाही बारामतीच्या दहशतीला आपली जागा दाखवून देईल, असे सांगत बारामतीकरांनी परिवर्तन करून पवारांना घरी बसवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यामध्ये महायुतीची सत्ता येणार हे शेंबडं पोरगं देखील सांगेल, असे सांगत पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची अवस्था ही 'शोले' सिनेमातील 'जेलर'सारखी झाल्याचे त्यांनी सांगितले. मी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहे. मला पैलवान दिसत नाहीत, असे पवार साहेब सांगत असले तरी या वयात त्यांना एकट्यालाच राज्यात प्रचारासाठी फिरावं लागतं आहे, ही बाब बरंच काही सांगून जाणारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता 'नॅनो पार्टी' करण्याचे काम मतदारांनी करावे, असे आवाहन करत बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यात सरकार आल्यावर बारामतीला टँकरमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, या परिसरात एकही टँकर दिसणार नाही. प्रत्येक शिवारात पाणी आणून दिले जाईल, असे सांगत या भागाचा विकास भाजप-शिवसेना युतीचे सरकार करेल, अशी ग्वाही द्यायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यासंदर्भात बोलतानाही 'अंधेर नगरी चौपट राजा' अशा थाटात आपलाच माणूस समजून या बँकेला घडवण्याचे काम अनेकांनी केले, ईडीची नोटीस आल्यानंतर यावर त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु कागदपत्रे ऑडिट रिपोर्ट यातून काय झाले आहे, हे सर्वांच्या समोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

'ही' माझी इच्छा...

गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून निवडणूक लढवावी ही माझी इच्छा होती, हा ढाण्या वाघ बारामतीत येऊन कमळ फुलविल्याशिवाय परत जाणार नाही, अशी माझी खात्री आहे. राज्यात पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली तरी बारामतीत पन्नास वर्षे पवार कुटुंबीयांची सत्ता असतानाही तालुक्याच्या पश्चिमेकडील गावे आजही पाण्यासाठी धडपडत आहेत, त्यांना थेंबभर पाणी देऊ शकत नसाल तर याचा उपयोग नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सर्वाधिक भाव देणाऱ्या माळेगाव कारखान्याइतकं अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील कारखान्यांनी का दिला नाही, असा सवाल करत अजित पवारांवर देखील मुख्यमंत्र्यांनी टीकास्त्र सोडले. याप्रसंगी गोपीचंद पडळकर यांनी ही बारामतीत कमळ फुलल्याशिवाय शांत बसणार नाही असे सांगत या निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी परिवर्तन करून दाखवावे, असे आवाहन केले.

VIDEO:सावरकरांना भारतरत्नच्या मागणीवर मनमोहन सिंग म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 08:34 PM IST

ताज्या बातम्या