जुन्नर 03 फेब्रुवारी : जुन्नर परिसरातील बिबट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान देण्यासाठी कंबर कसून उभ्या राहिलेल्या वनविभागाला नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आलेली कोंबडी अज्ञात चोराने पळवल्याची घटना समोर आली आहे कोंबडी पळवण्याची तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे नारायणगावच्या वनपाल मनीषा काळे यांनी सांगितले आहे. वारूळवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार या परिसरात बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता मात्र बिबट्याच्या सावजावर कोंबडी चोराने डला मारल्याचे समोर आले आहे.
कोंबडी चोरण्यासाठी चोरट्याने पिंजऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते न जमल्याने नंतर पिंजऱ्याची तार कापून कोंबडी चोरी केली. जुन्नर भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ पिंजरा लावण्याची मागणी करतात बिबट्याने अडकावे यासाठी सावज म्हणून शेळी किंवा कोंबडी ठेवली जाते.
मुख्यमंत्री निवडणूक लढविणार का? उद्धव ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा
त्याचा खर्च साधारण चारशे ते एक हजार रुपयांपर्यंत येतो मात्र चोरटे हे सावध लक्ष करू लागल्याने वनविभागा समोर एक नवीनच अडचण उभी राहिली आहे. या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. घनदाट जंगल, ऊसाचं पीक यामुळे या भागात बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे.
जंगलातून येवून हे बिबटे ऊसात लपून बसतात. त्याचबरोबर ते आजुबाजूच्या खेड्यांमध्येही येतात. शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. यामुळे वन खातं कायम असे पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याचं काम करतं.