हैदराबाद एन्काऊंटर.. नगरमध्ये जल्लोष, कोपर्डीतील 'त्या' नराधमांना फाशी कधी?

हैदराबाद एन्काऊंटर.. नगरमध्ये जल्लोष, कोपर्डीतील 'त्या' नराधमांना फाशी कधी?

मद्यधुंद नराधमांनी असे तोडले होते 'कोपर्डी'च्या'निर्भया'चे लचके!

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,6 डिसेंबर: हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे शुक्रवारी पोलिसांनी एन्काउंटर केले. तेलंगणा पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण देशभरात स्वागत करण्यात आले आहे. परंतु कोपर्डीतील 'त्या' आरोपींना फाशी कधी? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

कोपर्डीची घटना घडून साडेतीन वर्षे झाल्यानंतरही आरोपी जेलमध्ये आहेत. जिल्हा कोर्टाने नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हाय कोर्टात आता सुनावणी सुरु आहे. हैदराबादमधील निर्भयाच्या आरोपींचे एन्काऊंटर झाल्यानंतर जनतेतील आनंद आहे. ही घटना पाहता कोपर्डी प्रकरणाची सुनावणी त्वरित पूर्ण करून आरोपींना फाशी दिली जावी, अशी मागणी शिवप्रहार संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष आणि कोपर्डी प्रकरणाला चालना देणारे संजीव भोर यांनी केली आहे.

न्यायदान प्रक्रियेत होणारा उशीर आणि प्रक्रियेतील त्रुटींमुळे नराधम आरोपी शिक्षेपासून दूर राहतात. त्यामुळे समाजात असंतोष निर्माण होत असतो. त्यामुळेच हैदराबाद पोलिसांनी निर्भयाप्रकरणातील आरोपींचे एन्काऊंटर केल्यावर जल्लोष होत आहे. दुसरीकडे कोपर्डी सारख्या तेव्हढ्याच गंभीर प्रकरणातील आरोपी कायद्याचा आधार घेत आरामात आहेत. न्यायदानाची ही प्रक्रिया बदलली पाहिजे, अशी मागणी भोर यांनी करत कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फासापर्यंत पोहोचवा, अशी अपेक्षा संजीव भोर यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले. चौकशीसाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घडल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 'आम्ही चौघे पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे, असे समजून तिला जाळण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ती जिवंत होती,' असे आरोपीने सांगितले होते.

मद्यधुंद नराधमांनी असे तोडले होते 'कोपर्डी'च्या'निर्भया'चे लचके!

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती. दिल्लीतील निर्भयाप्रकरणाप्रमाणेच कोपर्डीतील घटनाही अत्यंत निर्घृण होती. अल्पवयीन मुलीवर केवळ बलात्कार करून नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली होती. तिच्या तोंडात बोळा कोंबला होता, तिचे केस उपटले होते. तिचे ओठ तोडले होते. दोन्ही हात खांद्यापासून निखळले होते, शेवटी डोक्यावर जबरदस्त वार करून गळा आवळून निर्भयाला संपवण्‍यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या