कोल्हापूर, 3 मार्च : कोल्हापूर जिल्ह्यातल्या राशिवडे गावात कौटुंबिक वादातून पत्नी आणि मेहुण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामीण भागात घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
राशिवडे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य मंजाबाई कावनेकर आणि त्यांचा भाऊ केरबा येडगे या दोघांचा मंदाबाई यांच्या पतीनेच निर्घृणपणे खून केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोरच झालेल्या या घटनेमुळे राशिवडे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. ही घटना समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मंजाबाई आणि त्यांचे पती सदाशिव या दोघांमध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून मतभेद सुरू होते. कौटुंबिक वाद असल्याची चर्चा होती. त्यातच मालमत्तेवरूनही त्या दोघांमध्ये खटके उडत असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी केरबा आणि त्याच्या साथीदारांनी सदाशिव कावणेकर यांना मारण्याचाही प्रयत्न केला होता. पण स्थानिक नागरिकांनी तो वाद मिटवला होता.
आज मंजाबाई आणि केरबा हे दोघं राशिवडे ग्रामपंचायत कार्यालयात आल्याची माहिती सदाशिव यांला मिळाली. त्यानंतर सदाशिव हा तिथे आला आणि ज्यावेळी मंजाबाई आणि केरबा हे ग्रामपंचायतीमधून बाहेर पडले त्यावेळी ग्रामपंचायतीच्या समोरच त्या दोघांवर मोठ्या अडकित्त्याने सदाशिवने सपासप वार केले.
हेही वाचा- मुंबईत हत्येचा भयंकर प्रकार, मोबाइल चार्जरची वायर तुटेपर्यंत आवळला मुलाचा गळा
हे दोन्ही खून झाल्यानंतर तात्काळ राधानगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे गावातही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मृतदेहाची उत्तरीय तपासणी ही कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे सदाशिव कावनेकर याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण कौटुंबिक वाद आणि रागापोटी दोन कुटुंब उध्वस्त झाली असल्याची गावात चर्चा आहे.