'गोकुळ'ची मलई खाण्यासाठी सगळेच राजकारणी आतुर

'गोकुळ'ची मलई खाण्यासाठी सगळेच राजकारणी आतुर

एक वेळ आमदारकी नको पण गोकुळचं संचालक पद द्या अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. एवढं वलंय आणि महत्त्व गोकुळला जिल्ह्याच्या राजकारणात आहे.

  • Share this:

कोल्हापूर 21 जानेवारी : लोकशाहीत निवडणूक म्हटली की गट-तट, मतभेद, शक्तिप्रदर्शन, आरोप-प्रत्यारोप आलेच मग ते अगदी गावातली ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा थेट लोकसभेची.

पण ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतची निवडणूकही रंगणार नाही अशा एका निवडणुकीची रणधुमाळी सध्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतेय, अर्थातच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची निवडणूक. एक वेळ आमदारकी नको पण गोकुळचं संचालक पद द्या अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते.  गोकुळ मध्ये एकूण 17 संचालक आहेत आणि संचालकपदाच्या आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दूध संस्थांचे ठराव लागतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील या निवडणुकीसाठी दूध संघाने 3659 संस्थांना पात्र ठरवलं आहे म्हणजेच या सगळ्या संस्थांकडून ठराव दाखल करून घ्यायला सुरुवातही झालेय.  उद्या म्हणजेच 22 जानेवारी हा ठराव दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे आणि या दिवसापर्यंत सत्ताधारी असो किंवा विरोधक दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. गोकुळ दूध संघावर अनेक वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता आहे. महादेवराव महाडिक यांनी अगदी शेतकऱ्याच्या मुलालाही गोकुळचं  अध्यक्षपद, संचालकपद दिलं पण गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

कडकनाथ घोटाळ्याचा कोल्हापूरमध्ये पहिला बळी, विष पिऊन तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक हे भाजपवासी झाले, परिणामी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हेही त्यांच्यासोबतच गेले त्यामुळे महाडिक पाटील गटाविरोधात आता विद्यमान गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या नेत्यांनी शड्डू ठोकलाय. जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख सत्ताकेंद्र म्हणून गोकुळला ओळखल जात, त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक, दोन्ही पाटील, मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार पी एन पाटील या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

त्या जुळ्यांना रस्त्यावर टाकणारी आई सापडली, प्रेम प्रकरणातून झाली होती मुलं

दरम्यान या सगळ्या घडामोडी मध्ये गोकुळच्या विद्यमान संचालकांमध्येही उभी फूट पडलेय. विद्यमान संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील चुयेकर यांनी परस्पर ठराव दाखल केल्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का बसलाय. या दरम्यान म्हाडाचे माजी अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे सत्तारुढ गटाबरोबर राहणार असल्याचही स्पष्ट झालय. येत्या एप्रिलमध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार आहे निवडणुकीची तारीख आणि मतमोजणीची तारीख अद्याप निश्चित नाही पण गोकुळची मलई खाण्यासाठी सगळेच राजकारणी आतुरले आहेत हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2020 07:19 PM IST

ताज्या बातम्या