कोल्हापूरमध्ये कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू, 5 गंभीर

कोल्हापूरमध्ये कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू, 5 गंभीर

अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 25 जानेवारी : देवदर्शन करून घरी परतत असताना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

कोल्हापूरपासून 25 किलोमीटर अंतरावरच्या आप्पाचीवाडी उड्डाणपुलाजवळ अपघातात कोल्हापूरचे दोघे जण ठार झाले आहेत. कोल्हापूर मधील सुरज सुलताने यांच्यासह त्यांचे कुटुंब आणि नातेवाईक हे दर अमावस्येला निपाणी जवळील तवंदी येथे देवदर्शनाला जात असतात. शुक्रवारीही देवदर्शनासाठी त्यांनी आपल्या ओमनी व्हॅनमधून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत त्यांची आई, बहीण, भाचा, भाची बहिणीची मैत्रीण आणि शेजारी गेले होते.

देवदर्शन करून रात्री घरी परतत असताना पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी इथं उड्डाणपुलाजवळ ओमनी व्हॅन आणि ऊस भरलेला ट्रक यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये व्हॅन चालवणारे सुरज सुलताने आणि श्रेया लागू हे दोघेही जागीच ठार झाले. तर सुमेधा लागू, अमृता साळवी, अनिश साळवी, आर्या कुलकर्णी, पौर्णिमा पंडित हे गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा - कंजारभाट: तरुणीची आत्महत्या, जातीत घेण्यास आजोबांनी दिला होता नकार

जखमींना तात्काळ कोल्हापुरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र सुरज आणि श्रेया लागू या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. ही बातमी समजताच मृत आणि जखमींच्या नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालय परिसरात गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 10:11 AM IST

ताज्या बातम्या