किरण मोहिते, सातारा 18 सप्टेंबर: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे वीर जवान सचिन संभाजी जाधव (वय 38 वर्ष) हे लेह-लडाख सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. सचिन हे 111 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ही बातमी गावात पसरताच जाधव कुटुंब आणि दुसाळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
शहीद जवान सचिन यांचे वडील संभाजी जाधव मेजर सुबेदार पदावरून निवृत्त झाले आहेत. तर सध्या भाऊही देशसेवा बजावत आहेत. शुक्रवारी रात्री शहीद जवान जाधव यांचे पार्थिव पुणे विमानतळावर आणले जाणार आहे. त्यानंतर ते त्याच्या मुळ गावी आणलं जाणार असून लष्करी इतमामात कोविडचे नियम पाळून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
चीनची नवी खेळी उघड
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान सीमेवर तणाव आहे. चीनच्या मुजोरीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यातच चीन भारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तिंवर नजर ठेवत असल्याचंही उघड झालं होतं. आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चीन भारतीय युद्धनौकांवरही पाळत ठेवत होता अशी माहिती बाहेर आली आहे.
चीनच्या Yuan Wang या टेहाळणी नौकेने मलाक्काच्या समुद्रधुनी परीसरात प्रवेश केला होता आणि तिथून ते भारतीय नौकांची टेहाळणी करत होते अशी माहिती समोर आली आहे. त्या भागात तैनात असलेल्या भारतीय युद्ध नौकांवर ते सतत लक्ष ठेऊन होते. भारतीय नौदलाच्या ही बाब लक्षात येताच चीनच्या नौकेने काढता पाय घेतला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने चीन भारतीयांवर नजर ठेवत असल्याचं पुढे आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता ही माहिती पुढे आल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढणार आहे.