मुसळधार! सांगली, कोल्हापूर आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुसळधार! सांगली, कोल्हापूर आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
आणखी दोन दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी असं आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.
सांगली 15 ऑक्टोबर: कृष्णा उपखोऱ्यातील सांगली, कोल्हापूर ही दोन शहरे व नदीकाठची गावे पुराच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. मागील दोन दिवसांपासून या भागात प्रचंड पाऊस होत आहे. आणखी दोन दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.
कोयना धरणातून 35,000 क्युसेक्स व इतर धरणातून 8000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मात्र पाऊस जास्त असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. कृष्णेची पाणी पातळी सध्या 29 फुट आहे मात्र ती संध्याकाळपर्यंत 38 ते 40 फुट इतकी होऊ शकते असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सांगली शहर व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन व पूर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर शहर व परिसरातील भागांना सध्या धोका नाही असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
भिमा खोऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. मागील 24 तासात येथे 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात सामान्य स्थिती आहे मात्र निरा, नरसिंहपूर व सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचं धुमशान सुरूच! तुफान माऱ्याने रस्त्याला पडलं भगदाड पाहा VIDEO
उजनी धरणामधून रात्री 11.30 ते पहाटे 5 यादरम्यान 25,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. सद्यस्थितीत उजनी धरणातून 140000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे. निरा-नरसिंहपुर या ठिकाणी सकाळी 9 वाजता 312000 क्युसेक्स इतका विसर्ग होता. मुसर्व नागरिकांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर येथील नागरिकांनी विशेषतः खबरदारी घ्यावी असेही आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.