कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये आलेल्या 60 भाविकांना विषबाधा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये आलेल्या 60 भाविकांना विषबाधा

एकादशी असल्यामुळे उपवासाचे पदार्थ खाल्ले होते. रात्री अडीच वाजेच्या सुमारास 60 भाविकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला.

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,9 नोव्हेंबर: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या 60 भाविकांना विषबाधा झाली. सर्व भाविक रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील आहेत. पंढरपूर येथील नगरपरिषदेच्या रुग्णालयात सगळ्यांवर उपचार सुरू आहेत. या भाविकांमध्ये वयोवृद्धांचा देखील समावेश आहे.

संगमेश्वर येथील भाविक कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आले होते. ते धुंडा महाराज मठा शेजारी इनामदार वाड्यात थांबले होते. शुक्रवारी त्यांनी एकादशी असल्यामुळे उपवासाचे पदार्थ खाल्ले होते. रात्री अडीच वाजेच्या सुमारास 60 भाविकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्या सर्व भाविकांना नगरपरिषदेच्या संसर्गजन्य रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी रुग्णांवर डॉ. धोत्रे उपचार करत आहेत. तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी तेथे उपस्थित असल्याची माहिती उपमुख्य अधिकारी सुनिल वाळूजकर यांनी दिली. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

चालकाला डुलकी ट्रॅक्टरवर पिकअप आदळून पाच वारकरी ठार...

चालकाला डुलकी लागल्याने महिंद्रा पिकअप ट्रॅक्टर आदळल्याने कार्तिक वारीसाठी पंढरपूरकडे जाणारे पाच वारकरी ठार झाले. अन्य पाच वारकरी गंभीर जखमी झाले. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास सांगोला येथे पंढरपूर रस्त्यावरील मांजरीजवळ हा अपघात झाला. कार्तिक वारीनिमित्त मंडाेली (ता. बेळगाव) येथून दहा वारकरी महिंद्रा पिकअपमधून गुरुवारी रात्री पंढरपूरकडे निघाले होते. पहाटे चारच्या सुमारास सांगोला येथे चहा घेऊन ते पंढरपूरकडे निघाले. मांजरीजवळ शब्बीर मुलाणी यांच्या घरासमोर विटा भरून सांगाेल्याकडे निघालेला ट्रॅक्टर चुकीच्या दिशेने जाऊन पिकअपवर धडकला. ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉल्यांमध्ये विटा होत्या. अपघातानंतर चालकाशेजारी बसलेले परशुराम दळवी जागे झाले. चालक यल्लप्पा देवाप्पा पाटील (रा. हंगरगा, ता. बेळगाव) हा जखमी अवस्थेत रोडच्या कडेला बसला होता. तेथेच त्याचा मृत्यू झाला. कृष्णा कणबरकर, लक्ष्मण ऊर्फ टेलर परशुराम आंबेवाडीकर, महादेव कणबरकर, अरुण मुतेकर हे जागीच ठार झाले. गणपत दळवी, गुड्डू तरळे, मात्रू साळवी, वैजू कणबरकर, दिलीप शेरेकर (सर्व रा. मंडाेली, ता. बेळगाव) हे जखमी झाले. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 04:28 PM IST

ताज्या बातम्या