मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुरानं वेढलेली गावं आणि देवाला वाचवण्यासाठी धडपडणारी माणसं : 'महापूर' एक थरारक अनुभव

पुरानं वेढलेली गावं आणि देवाला वाचवण्यासाठी धडपडणारी माणसं : 'महापूर' एक थरारक अनुभव

'नदीतून बोट पुढे नेली तर हम सबकी डेडबॉडी भी नही मिलेंगी...' NDRF चा जवान सांगत होता. News18Lokmat च्या अँकरनी गेल्या वर्षीच्या महापुराच्या कव्हरेजचे नोंदवलेले फर्स्टहँड थरारक अनुभव आहे.

'नदीतून बोट पुढे नेली तर हम सबकी डेडबॉडी भी नही मिलेंगी...' NDRF चा जवान सांगत होता. News18Lokmat च्या अँकरनी गेल्या वर्षीच्या महापुराच्या कव्हरेजचे नोंदवलेले फर्स्टहँड थरारक अनुभव आहे.

'नदीतून बोट पुढे नेली तर हम सबकी डेडबॉडी भी नही मिलेंगी...' NDRF चा जवान सांगत होता. News18Lokmat च्या अँकरनी गेल्या वर्षीच्या महापुराच्या कव्हरेजचे नोंदवलेले फर्स्टहँड थरारक अनुभव आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

संदीप देसाई

8 ऑगस्ट.. आजचाच तो दिवस.. बरोबर एक वर्षापूर्वी 2019 च्या दुपारी मी महापुराच्या कव्हरेजसाठी मुंबईहून निघालो. साधारणतः दुपारी मी कोल्हापूरसाठी निघालो असेन. मी एकटाच निघालो. कारण मुंबईतील सगळे कॅमेरा युनिट आधीच कोल्हापूर, सांगलीला रिपोर्टर्ससोबत गेले होते. पूरस्थितीचा अंदाज असला तरी पुढच्या दोन दिवसात समोर काय अनुभव वाढून ठेवलाय याची कल्पनाही निघताना आली नव्हती.

माझ्यासोबत न्यूज18 लोकमतची नाशिकची टीम येणार होती. मी पुण्यात पोहोचणार होतो आणि नाशिकची टीम मला पुण्यात जॉईन करणार होती. संध्याकाळी 6 वाजता मी पुण्यात पोहोचलो. नाशिकच्या टीमशी संपर्कात होतोच. पण पुण्यात गेल्यावर जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा आळेफाट्यावर गाडीला काही तरी प्रॉब्लेम आला होता आणि त्यांनी मॅकॅनिक बोलावला होता. पुराच्या कव्हरेजला जातानाच सुरुवात झाली या अडचणीने. गाडी दुरुस्त करून नाशिकच्या टीमला पुण्यात पोहोचायला रात्रीचे 11.30 वाजले. तोवर मी आमच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये थांबून होतो.

रात्री 12 वाजता आम्ही पुणे सोडलं आणि कोल्हापूरच्या दिशेने वाटचाल सुरू केली. नाशिकच्या टीममध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागूल, लाईव्ह यू ऑपरेटर विकी आणि चालक देशमुख असे तिघे जण होते. आमचा चौघांचा प्रवास सुरू झाला. पावसाची एखादी सर मध्ये मध्ये येत होती.

पुणे-बेंगलोर हायवे सातारा कराड आणि कोल्हापूर दरम्यान ब्लॉक होता ही माहिती होती. रात्री उशिरा कराडमध्ये पोहोचलो. कराडच्या जरासं पुढे गेल्यावर रस्त्यात ट्रक उभे होते. सुरुवातीला असं वाटलं की पुढे जाऊन रस्ता मिळेल. मात्र 2 किमी पुढे गेल्यावर लक्षात आलं की हा रस्ता असाच कोल्हापूरपर्यंत ब्लॉक आहे. आणि मग आम्ही गाडी विरुद्ध दिशेला टाकली.. आणि आमचा कोल्हापूरच्या दिशेने रस्त्याच्या विरुद्ध बाजूने प्रवास सुरू झाला.. पाऊस मी म्हणणारा. बऱ्याचदा एवढी मोठी सर यायची की गाडी बाजूला लाऊन थांबावं लागाचयं. त्यात विरुद्ध दिशेनं चाललो असलो तरी समोरून येणाऱ्या गाड्या नसल्यात जमा होत्या. कारण कोल्हापूरवरूनही रस्ता बंद होता. असा सगळा प्रवास करत पहाटे 6 वाजता आम्ही वाठारला पोहोचलो.

पाऊस थोडासा ओसरला होता. वाठारच्या नाक्यावर एका टपरीवर चहा घेतला. आणि आम्ही पुढे निघालो. आमच्या समोर काय वाढून ठेवलंय याचा आम्हाला जराही अंदाज नव्हता. मला सकाळी 7 वाजता लाईव्ह लिंक द्यायची होती. आणि त्यासाठी मला शिरोळमध्ये पोहोचायचं होतं. हातकणंगलेत पोहोचल्यावर मी तत्कालीन स्थानिक आमदार उल्हास पाटील यांना फोन केला. तहसिलदारांना फोन केला. तर तहसिलदार ऑफिसमध्ये त्यांची बैठक सुरू होती. फोनवर बोलत बोलत आम्ही पोहोचलो शिरोळमध्ये. शिरोळच्या ज्या भागात पाणी शिरलं होतं. तिथं गेलो. सात वाजताच्या बुलेटीनला लाईव्ह दिलं. तो रस्ता होता नृसिंहवाडी आणि शिरोळला जोडणारा.. लाईव्ह सुरू असतानाच आमदार उल्हास पाटील आणि एनडीआरएफची टीम तिथे पोहोचली.. आमदारांचा आणि जवानांचा बाईटही घेतला. तेव्हा एनडीआरएफच्या जवानांची तयारी झाली. आणि ते बचाव कार्यासाठी निघणार होते.

आता इथुनपूढे खरा प्रवास सुरू झाला. आम्ही एनडीआरएफच्या टीमसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला.. आमदार उल्हास पाटलांनी आम्ही रात्रीपर्यंत येणार नाही असं आम्हाला सांगितलं. पण नृसिहवाडी आणि त्या परिसरातील पूर परिस्थीतीचा अंदाज नसल्यानं आम्ही एनडीआरएफच्या बोटीत बसलो. पूर गंभीर आहे हे माहीत होतं. मात्र त्याची गंभीरता किती आहे याचा अंदाज नव्हता.. आम्हाला कळलं की आलास या गावात काही लोक अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी जायचं आहे.

एनडीआरएफच्या 3 रबर बोटी होत्या. त्यामध्ये 18 जवान, 2 अधिकारी, एक गावकरी, आमदार उल्हास पाटील, आमची तीन जणांची टीम, आणि दुसऱ्या एका वृत्तवाहिनीचे 2 प्रतिनिधी आमच्यासोबत होते. रबर बोटीमध्ये बसून प्रवास सुरू झाला. आणि एखादा किलोमीटर आत गेल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण खूप मोठी रिस्क घेतलीय. चारही बाजून प्रचंड पाणी, वाटेतली दुमजली, तीन मजली घरं पाण्याखाली, नारळाच्या झाडांचे फक्त शेंडेच दिसावेत असं पाणी.. बोटी जशा पुढे जातील तशी मनात भीती दाटत होती. पुन्हा पुन्हा वाटत होतं की बोटीत बसून आपण चूक केलीय का?

शिरोळ आणि नृरसिंहवाडी यामधलं अंतर किती होतं याचा अंदाजच नव्हता. मी कोल्हापूर जिल्ह्यातला असलो तरी शिरोळ आणि त्या भागामध्ये फारसा फिरलो नव्हतो. तेव्हा भीतीपोटी एक दोन किलोमीटर पुढे गेल्यावर जो गावकरी आमच्या सोबत होता. त्याला मी विचारलं दादा अजून किती लांब जायचंय? तर त्यानं सांगितलं की शिरोळ ते औरवाड 8 किलोमीटर आणि तिथून कवठेगुलंद 3 किमी आणि तिथून आलास 3 किमी. म्हणजे साधारणता जिथं आम्हाला जायचं होतं तिथं जायला 12 ते 15 किमीचा प्रवास करावा लागणार होता. तोही महापूरातून.

" isDesktop="true" id="470118" >

पुढे काय वाढून ठेवलंय याचा अजिबात अंदाज येत नव्हता. मात्र परिस्थिती बिकट आहे हे पक्क समजलं होतं. जसजसा औरवाडच्या दिशेने म्हणजेच नदीच्या दिशेने आम्ही पुढे पुढे जात होतो, तसतसा पाण्याची पातळी आणि पाण्याचा वेगही वाढत होता. त्यातच एनडीआरएफच्या जवानांना आम्ही विचारत होतो की आम्ही घातलेलं लाईफ जॅकेट किती काळ जगवू शकते. तुम्हाला कसं ट्रेनिंग दिलं जातं. आता पाणी अजून वाढलं तर काय करायचं वगैरे वगैरे.. हे माहिती म्हणून विचारत नव्हतो. तर मनातलं भितीचं काहूर प्रचंड वेगात वाढायला लागलं होतं.. वाटेत बोटीच्या आडवं काही तरी आलं की त्यात भर पडायची. मरण डोळ्यासमोर दिसलं की सगळं आठवायला लागलं.  तसं काहीसं समोर यायला लागलं. आई, भाऊ, बहिणी, नातेवाईक, घर, गाव सगळं काही डोक्यात आणि डोळ्यांसमोर फिरायला लागलं.  नदीच्या जवळ जवळ जसं पोहोचायला लागलो होतो तसा बोटीलाही पाण्याचा जोर जाणवायला लागला. बोट हेलकावे खायला लागली होती. तेव्हा कळलं की नदी जवळ आलीय.

नदीच्या आठ किलोमीटरवर असलेल्या शिरोळमध्ये पाणी एक ते दोन पुरुष पाणी होतं तर नदीच्या परिसरात किती पाणी आणि त्याचा वेग असेल हा अंदाज करून बघा.. बोट नदीतून नेणार का हा प्रश्न आला आणि काळजाचं पाणी झालं. मी न राहवून एनडीआरएफच्या अधिकाऱ्याला विचारलं की आपण नदीतून बोट घालणार का? ते म्हणाले जर नदीतून बोट पुढे नेली तर हम सबकी डेडबॉडी भी नही मिलेंगी.. आणि या सगळ्यामध्ये समोर औरवाड आणि नृसिंहवाडीला जोडणारा पूल दिसला.. आणि जीव फार नाही पण थोडासा भांड्यात पडला.

बोटी पुलाच्या बाजूला थांबवल्या. एवढ्या मोठ्या महापुरातही तो पूल मोकळा होता. कारण नवीन झालेल्या पुलावरून आतापर्यंत कधीच पाणी गेलं नव्हतं. आता बोटी उचलून पुलाच्या पलिकडे न्यायच्या होत्या. त्यामध्ये खाण्याचं साहित्य, पाण्याच्या बाटल्या, बोटींना लागणारं पेट्रोल हे सगळं होतं. ते नेत असताना जवानांची मोठी दमछाक झाली. आम्ही थोडासा मदत करण्याचा प्रयत्न केला.

बोटी जेव्हा औरवाडच्या पुलाच्या पलीकडे आल्या तेव्हा समोर औरवाडमध्ये 50 ते 60 नागरिकांचा जमाव दिसला.. ते आमदार उल्हास पाटील यांच्यावर संतापले होते. तुम्हाला आता आमची आठवण झाली का, एवढ्या दिवसात तुम्ही एकदाही आला नाहीत, आणि त्यांचं म्हणणं होतं की मंदिरातून देवांना आणि पुजाऱ्याला बाहेर काढा. म्हणजे जसं नृरसिंहवाडीचं मंदिर आहे नदी काठाला तसंच त्याच्या विरुद्ध बाजूला औरवाडमध्येही दत्ताचं मंदिर आहे आणि लोकांची देवावर खूप श्रद्धा आहे. आमदार उल्हास पाटील यांनी जेव्हा त्या गावकऱ्यांना सांगितलं की येताना देव बाहेर काढू तेव्हा मात्र लोकांचा संताप अनावर झाला.

हा एवढा संवाद सुरू होता ते साधारण 50 मीटर अंतरावर.. गावकरी काठावर आणि आम्ही बोटीमध्ये. शेवटी लोकांचा संताप लक्षात घेता देवांना बाहेर काढायचं ठरलं आणि एक बोट आणि काही जवान मंदिराच्या दिशेने गेले. नदीच्या प्रवाहाला लागून मंदिर म्हणजे तिथली पूराची स्थिती म्हणजे भयंकर होती. पुन्हा एकदा भीती वाटायला लागली. अर्धा तास झाला तरी ती बोट आली नाही. म्हणून आमची बोटही तिकडे नेली. पाण्याचा वेग वाढत होता. तर पुढे मंदिराच्या बाजूला ती बोट दिसली आणि आरती सुरू असल्याचा आवाज आला. कारण मंदिरातून देव जर बाहेर काढायचे असले तर विधीवत काढावे लागतात. आणि तेच सुरू होतं. त्यासाठीच आरती सुरू होती. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की माणसांना मरण दिसत होतं. आलास, बुबनाळ गावातील हजारो लोक पाण्यात अडकले होते. तरीही औरवाडच्या लोकांना त्यांच्या जीवापेक्षा मंदिरातील देव बाहेर काढण्याचं महत्त्व अधिक होतं. पुजाऱ्यांना काढूनही पुढे जाता आलं असतं. पण देव बाहेर काढणं आणि आरत्या करण्यात वेळ घालवणं थोडसं चीड आणणारं होतं. देवावर आमचीही श्रद्धा आहे. मात्र ते थोडं अती होतं, असं वाटलं.

औरवाडमध्ये एका घरात देव ठेवून आम्ही पुढे निघालो. औरवाड गावात कंबरभर आणि काही ठिकाणी गुडघाभर पाणी होतं. त्यातूनच शूट करत बाईट घेणंही सुरू होतं. मी विचार करत होतो की आपण औरवाडमध्ये थांबू या. कारण पुढे काय आहे माहीत नव्हतं. आगीतून फुफाट्यात जायला होईल ही भीती होती. तर एकानं सांगितलं की आता पुढच्या कवठेगुलंद गावात पाणी नाही. ते गाव उंचीवर आहे. तिथं पाणी पोहोचू शकत नाही. मग आम्ही पुढे जाण्याच्या निर्णय घेतला.

साधारण एक किमी पाण्यातून बोटी ओढत न्याव्या लागल्या. आणि मग रस्ता दिसला. बोटी नेण्यासाठी तिथे एका ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ट्रकमध्ये बोटी ठेवल्या आणि काही वेळातच कवठेगुलंदला पोहोतलो. त्या गावात प्रचंड गर्दी होती. आजूबाजूच्या पुरात अडकलेल्या सगळ्या गावातले नागरिक त्या एकाच गावात होते. त्या वेळी त्या गावात साधारणता 5 ते 6 हजार माणसं होती. शिरोळपासून सकाळी 7.30 वाजता आम्ही प्रवास सुरू केला. आणि पाण्याच्या भल्या मोठ्या प्रवाहातून, कृष्णा नदी ओलांडून आणि वाटेत आलेल्या प्रचंड संकटांचा सामना करून आम्ही 2.30 ते 3 वाजता कवठेगुलंदमध्ये पोहोचलो. म्हणजे शिरोळ ते कवठे गुलंद हे 8 ते 10 किमीचं अंतर पुरातून पार करायला आम्हाला 6 ते 7 तास लागले. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की परिस्थिती किती भीषण होती.

हा सगळा प्रवास करून कवठे गुलंदमध्ये पोहोचल्यावर नाक्यावर ट्रक थांबला. त्यावेळी नाक्यावर लोकांचा गराडा होता. आम्हाला लक्षात आलं की जेवणाचं वाटप सुरु आहे. आम्ही खाली उतरलो. त्या गर्दीतून पुढे होत जेवण घेतलं. जेवण म्हणजे भात आणि आमटी होती. पण त्या परिस्थितीत लोकांना ते जेवण देणं आणि इतक्या लोकांना तेही खूपच महत्त्वाचं आणि मोठं काम होतं. एक सहकारी म्हणाला भात खूपच कच्चा आहे. आणि होताही. भुकेल्या पोटी कसंतरी चावून चावून चार घास पोटात ढकलले. आणि ट्रक पुढे निघाला म्हणून पुन्हा ट्रकमध्ये बसलो. आता बोटींसह ट्रक जाणार होता आलासमधील लोकांना बाहेर काढायला..

कवठेगुलंदवरून ट्रक आलासला निघाला. पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. गाव सोडलं. मोबाईलची बॅटरी संपत आली होती. सकाळपासून घेतलेलं एकही फुटेज ऑफिसला पाठवू शकलो नव्हतो. कवठेगुलंद आणि आलासच्यामध्ये शेतात एक घर दिसलं. पावसाची परिस्थिती आणि सकाळपासूनचा अनुभव लक्षात घेता आम्ही तिथे उतरण्याच्या विचार केला. आणि एका शेतातल्या घराच्या दारात ट्रक थांबवून आम्ही त्यातून खाली उतरलो.. आमच्याकडचे बुम (माईक) आणि कॅमेरा बॅगेत ठेवला होता. त्या घराच्या दारात आम्ही गेलो तेव्हड्यात त्या घरातील महिला बाहेर आल्या आणि म्हणाल्या आमच्या घरात माणसं खूप आहेत. बसायला जागा नाही. तुम्ही कवठेगुलंदच्या शाळेत थांबा तिथं व्यवस्था केलीय. तेवढ्यात मागून दुसरा रिपोर्टर मित्र आला. त्याच्या हातात बूम होता. तर त्या घरातील तरुणाने तो पाहिला. मग आम्ही त्यांना विनंती केली. आम्ही रिपोर्टर आहोत. फक्त थोडावेळ थांबून फुटेज पाठवतो. आणि निघतो.. त्यांनी आमची विनंती मान्य केली. ते होतं घोडपडे कुटुंब. तीनही बाजूंनी त्या गावाला आणि परिसराला पुराचा वेढा होता. आणि आम्ही त्या घरात गेलो. भिजलेली कपडे, मोबाईलची संपत आलेली बॅटरी, नेटवर्क नव्हतं. मग करायचं काय. त्या शेतकऱ्याच्या टेरेसवर नेटवर्क येत होतं. मग मुसळधार पावसात छत्री घेऊन टेरेसवरून अडखळत अडखळत फुटेज पाठवलं.

त्याआधी जेव्हा त्या शेतकऱ्यांच्या घरात आम्ही पोहोचलो. तेव्हा त्यांनी विचारलं की चहा घेणार का. अर्थातच हो म्हटलं. काही वेळापूर्वी थोडासा खाल्लेला कच्चा भात जेवण झालंय हे सांगण्याइतपत पुरेसा नव्हता. मग त्यांनी 15 मिनीटांमध्ये डाळ भात करून आम्हाला वाढला..कदाचित गावात शाळेत देण्यासाठी जास्त जेवण त्यांनी केलं होतं. आम्ही 4 ते 4.30 वाजताच्या दरम्यान जेवलो. आता आमच्या मनात पुढचा विचार सुरू झाला. पुढे काय? आलेल्या मार्गे पाण्यातून जाणं शक्य नव्हतं. कारण एनडीआरएफ त्या दिवशी परतणार नव्हते. भागात नेटवर्क नसल्यानं ते कुठे आहेत याचा अंदाज नव्हता. ऑफिसला एखादा कॉल सोडून काही नाही. त्या शेतकऱ्याच्या शेतातून कृष्णेचं ते आक्राळविक्राळ रुप दिसत होते. काही काळ रस्त्यावर थांबून अंदाज घेतला. आलासवरून आलेला प्रत्येक माणूस सांगत होता पाणी वाढतंय. तशी मनात भीती जास्तच वाढत होती. हळूहळू अंधार पडत आला होता.

त्यावेळी घोरपडे कुटुंबातील माणसांनी आम्हाला सांगितलं की आज इथेच थांबा सकाळी निघा. आता निघणं धाडसाचं होईल. आमच्याकडेही काही पर्याय नव्हता. आम्ही थांबायचं ठरवलं. घोरपडे कुटुंबातील माणसं आणि आम्ही बोलत बसलो होतो. साधारण 7 वाजताच्या दरम्यान. बोलण्यात आणि वातावरणात दोन्हीकडे गंभीरता होती. पुरामुळे मागल्या काही दिवसांपासून लाईट नव्हती. त्यामुळे मोबाईल ऑफ झालेले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत वातावरण जरा हलकं-फुलकं करण्याचा प्रयत्न सगळेच करत होते. आता पूर नाही उतरला तर पुढे काय? या अगोदर आलेल्या पुरावर चर्चा.. आणि मग बोलण्यातून लक्षात आलं की एक रस्ता आहे जिकडे जाता येऊ शकतं. तो रस्ता बाहेर पडतो कर्नाटकात. म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यात. मग मी क्षणाचाही विलंब न करता सहकाऱ्यांना सांगितलं की आपण कागवाड मार्गे निघूया. कारण आलेल्या मार्गे जाणं केवळ अशक्य होतं. आणि आमच्या पैकी जवळपास सर्वांनाच बोटीत बसायचं धाडस शिल्लक नव्हतं. येतानाचा अनुभव खूप भीतीदायक होता. मी म्हटलं मग आता कवठेगुलंदला जाऊन थोडा अंदाज घ्यावा की सकाळी काय करता येऊ शकेल.

या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका तरुणाला मी विनंती केली की आपण जरा तुझ्या बाईकवरून कवठेगुलंदला जाऊन येऊ. आणि आम्ही बाईकवरून कवठे गुलंदला गेलो. रात्रीचे साधारणता 8.30 वाजले असतील. तर तिथे माहिती मिळाली की कवठेगुलंद ते कागवाड 2 ते 3 मिनीबस दिवसभर सुरू आहेत. आलास, बुबनाळ आणि आजुबाजुला पुरातल्या गावातील लोकांना कर्नाटकात जाण्यासाठी ती सोय केली होती. कारण त्या परिसरातील अनेकांचे नातेवाईक बेळगाव जिल्ह्यात आहेत. ही सगळी माहिती मिळाल्यावर मनाला थोडं समाधान वाटलं. त्यानंतर आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या घरी आलो. आणि माझे सहकारी आणि दुसऱ्या चॅनेलचे मित्र जे माझ्यासोबत होते त्यांच्याशी चर्चा केली. आणि उद्या सकाळी निघायचं ठरवलं.

थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसलो. तर जेवणात आम्हाला गुलाबजाम दिसले. थोडं आश्चर्य वाटलं. परिस्थिती गुलाबजाम वाढण्याची नव्हती.. तेव्हा मी न राहून विचारलं की, गुलाबजाम कसे? तर त्यांनी सांगितलं की दुभत्या चार-पाच म्हशी आहेत. पूर आल्यापासून दूध घरीच आहे. मग एवढ्या दूधाचं काय करणार? 'एक वेळचं दूध कवठेगुलंदला देऊन येतो. जिथे शाळेत माणसं ठेवली आहेत, आजूबाजूच्या गावातली. आणि एका वेळच्या दुधाचं पोरं बनवतात काही तरी!'

शेतातलं घर असलं तरी घोरपडेंचं घर हे आरसीसी होतं. पक्कं. हॉलमध्ये झोपायची आमची व्यवस्था केली होती. बाहेर पावसाचा आवाज. पूर्णपणे काळोख, आणि रात किड्यांचा किर्र आवाज. या सगळ्यात दिवसा केलेला तो बोटीतला पूरातून प्रवास नजरेसमोरून जात नव्हता. बोटीला काही झालं असतं तर हा प्रश्न सतत मनात येत होता. आणि दुसरी भीती म्हणजे त्या शेतकऱ्याच्या दारातून पाहिलेलं कृष्णेचं रुप. जर अजून पाणी सोडलं आणि पाऊस कमी नाही झाला तर इकडे पाणी येऊ शकतं असं एका गावकऱ्यानं सांगितलं होतं ती दुसरी भीती. या सगळ्यात कधी झोप लागली कळलंच नाही. मात्र घोडपडे कुटुंबानं त्या रात्री आश्रय दिला नसता तर काय? एवढ्या पावसात, पुराच्या गंभीर परिस्थीत कुठे जाणार होतो आणि कुठे राहणार होतो. त्या दिवशी घोरपडे कुटुंब आमच्यासाठी देवदूतासारखं धावून आलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चहा घेतला आणि साधारणता 8 वाजता निघालो. रस्त्यावर येताच आम्हाला आमदार उल्हास पाटील आणि एनडीआऱएफची टीम दिसली. आम्हाला पाहून थांबले. आणि त्यांनी सांगितलं की रात्री तुमचा फोन लागला नाही. तुम्ही कुठे गेलात कुठे राहिलात याची थोडी काळजी वाटली. आमची कागवाडमध्ये राहायची व्यवस्था केली होती. त्यावेळी वाटलं की यांना कॉल केला असता तर घोडपडे कुटुंबाला त्रास द्यावा लागला नसता. पण वेळ निघून गेली होती. आणि त्या शेतकऱ्याच्या कुटुंबानं त्या परिस्थितीत दिलेला एका दिवसाचा आधार अमूल्य होता.

तिथून निघायचा प्लॅन केलेले आम्ही पुन्हा आलासचा जायला निघालो. पूर कमी आला नव्हता मात्र पाऊस कमी आला होता. बोटीत बसायचं नव्हतं मात्र तरीही बोटीत बसलोच. आणि थोडं कव्हरेज केलं. कालपासून ज्या आलासचं नावं ऐकलं होतं. तिथली परिस्थिती तर खूपच भयंकर होती. फक्त माणसं काढायला सुरू होती. जनावरांचं काय झालं याचं उत्तर सांगायची गरज नाही. पूर्ण एक दिवस हजारो लोकांना बाहेर काढल्यावरही अजून हजारावर लोक आलासमध्ये होते.

आलासमधून आम्ही निघालो. एनडीआरएफचं बचाव काम सलग दुसऱ्या दिवशी सुरूच होतं. आम्ही निघालो मात्र आमच्याकडे ना गाडी होती ना पैसे.. आमदार उल्हास पाटील यांच्या एका कार्यकर्त्याला आम्ही विनंती केली की कागवाडला सोडा. तो तयार झाला. आलासवरून कागवाडला येताना कवठेगुलंदमध्ये लोकांच्या प्रतिक्रीया आणि परिस्थीतीचा थोडा आढावा घेतला. आणि आम्ही साधारणतः एका तासात कागवाडच्या शाळेत पोहोचले. तिथं पूरग्रस्तांसाठी निवाऱ्याची सोय केली होती.. गावकऱ्यांनी राहण्यासोबतच नाष्टा आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था केली होती. जवळपास पाचशे पूरग्रस्त तिथं आश्रयाला होते.एखादा दिवस थांबून आपापल्या नातेवाईकांकडे ते जात होते. आम्ही ही नाष्ता केला. थोडं कव्हरेज केलं. रेंज फुल्ल असल्यानं लाईव्ह केलं. आणि सकाळपासून घेतलेले सगळे फुटेज, बाईट्स आणि सर्व काही ऑफिसला पाठवून दिलं.

आता प्रश्न होता आम्ही तिथून कसे जाणार. स्थानिक तरुण आणि काही कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर मिरजपर्यंत जावं लागेल तिथून एसटी सुरू आहेत अशी माहिती मिळाली. कागवाड ते मिरज जाणार कसं? गाड्या बंद होत्या. आणि आमच्याकडे पैसेही नव्हते. मग तिथले सामाजिक कार्यकर्ते ज्योतीकुमार पाटील यांनी आपली कार आम्हाला मिरजपर्यंत पोहोचवण्यासाठी दिली. आणि आम्ही कारमधून मिरजच्या दिशेने जिथे रस्ते बंद आहेत ते चुकवत फिरून फिरून निघालो. आमची गाडी होती शिरोळमध्येच जी आदल्या दिवशी पहाटे तिथं लावली होती. चालक देशमुख यांना फोन करून गाडी कराडला आणायला सांगितली. आणि मिरजमध्ये पोहोचल्यानंतर आम्हालाही कराडला जायचं होतं. कारण मिरज ते कोल्हापूर सर्व रस्ते बंद होते.

साधारणतः तासाभरात आम्ही मिरजमध्ये पोहोचलो. तिथं पोहोचल्याबरोबर आम्हाला तासगाव मार्गे कराड एसटी लागलेली दिसली. कंडक्टर ना भेटलो आणि सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत. आणि आम्ही तुम्हाला कराडमध्ये उतरल्यावर पैसे देऊ. त्यांनी ते मान्य केलं. आणि आम्ही मिरज – कराड व्हाया तासगाव गाडीत बसलो. आम्हाला सोडायला कागवाडमधून एक तरुण आला होता. बाळासो कल्लोळ नावाचा. तो आजही संपर्कात आहे. गाडीत बसताना त्यांने 200 रुपये मला दिले. म्हणाला सर वाटेत लागलेच तर काय करणार ठेवा. आणि मी पण घेतले. खरंच त्याने दिलेल्या पैशांचा प्रवासात पाणी विकत घ्यायला फायदा झाला. प्रवासात पाणी घेतलं आणि कागवाडमधून बांधून आणलेल्या भाकऱ्या आम्ही एसटीतच फस्त केल्या. आणि आम्ही संध्याकाळी कराडमध्ये पोहोचलो. किती तास प्रवास केला नेमकं आठवत नाही. पण पोहोचेपर्यंत 5.30 वैगेरे वाजत आले होते. तोपर्यंत आमची गाडी कराडला पोहोचली होती. तिथं एसटीच्या वाहकाला तिकिटाचे पैसे दिले. आणि एकत्र सगळे चहा प्यायलो. आणि पुन्हा गाडी हाकली ती इचलकरंजीच्या दिशेने.. त्यानंतर पुढचे 6 दिवस मी पूराचं कव्हरेज करत होतो. परिस्थिती थोडीसी निवळत आली होती. पुढच्या काही दिवसांत इचलकरंजी, वडगाव तालुक्यातील गावं, पन्हाळा तालुक्यातील गावं असं कव्हरेज करत चंदगड तालुकाही कव्हर केला. तिथंही खूप नुकसान झालं होतं. आणि 8 दिवसांनंतर मुंबईकडे मार्गस्थ झालो.  8 दिवस पुराचं कव्हरेज करताना पहिला दिवस आणि पहिल्या रात्री जो अनुभव आला तो आयुष्यातला सर्वात भीतीदायक आणि अनपेक्षित असा होता. तो संपूर्ण आयुष्यात स्मरणात राहील.

First published:

Tags: Kolhapur