मुंबईतून मृतदेह थेट कोल्हापूरला नेला, 2 जणांना झाली कोरोनाची लागण

मुंबईतून मृतदेह थेट कोल्हापूरला नेला, 2 जणांना झाली कोरोनाची लागण

कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्यानंतर गडहिंग्लज आजरा भागातील 20 जणांना तात्काळ क्वारन्टाइन करण्यात आलं आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 9 मे : मृतदेह घेऊन आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार कोल्हापूरमध्ये उघडकीस आला आहे. संबंधित व्यक्तींनी मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्यातील गावात मृतदेह आणला होता. मृतदेहासोबत महिला पोलीस कर्मचारीही असल्याचं उघड झालं आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असताना रुग्णवाहिका मुंबईमधून कोल्हापूरपर्यंत आली कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आजरा तालुक्यातील हारूर गावापर्यंत मुंबईतून मृतदेह आणण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई-पुण्याहून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मुंबई-पुण्यामधून नागरिकांना परवानगी दिली जात असल्याची माहिती आहे. त्यातच कोल्हापूरमध्ये कोरोनाची लागण झालेली महिला तब्बल वीस जणांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्यानंतर गडहिंग्लज आजरा भागातील 20 जणांना तात्काळ क्वारन्टाइन करण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. जिल्ह्याला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी मोठी कसरत केली जात असताच अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह

आजरा येथील एक पुरुष आणि महिला, तर चंदगडमधील पुरुष कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. सिपीआरकडे शुक्रवारी रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाले. एकाच वेळी तीन रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहचली आहे. काल कोरोनाबाधित आढळलेले तिन्ही रुग्ण मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्यात आले होते. कोल्हापूर आतापर्यंत 6 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

First published: May 9, 2020, 5:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या