पुण्यात बेड आणि रुग्णवाहिकेअभावी पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

पुण्यात बेड आणि रुग्णवाहिकेअभावी पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

बेड आणि रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा हकनाक बळी गेला. त्यानंतर राज्यातील आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

  • Share this:

सातारा, 3 सप्टेंबर : पुणे शहरात बेड आणि रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा हकनाक बळी गेला. त्यानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या (Satara) पालकमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. कुठलाही रुग्ण बेडपासून वंचित राहू नये म्हणून कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी एक ॲप तयार करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केल्या.

छत्रपती शिवाजी संग्रालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे रुग्णालय लवकरात लवकर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरात येईल यासाठी कामांचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या संबंधित तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींना द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीत केल्या.

तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित तालुक्यांच्या प्रांताधिकारी यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींना कोरोना रुग्णांची संख्या रोजच्या रोज द्यावी. ज्यांना कोरोनाचा संसर्ग नाही इतर आजारांसाठी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत अशा रुग्णांना काही रुग्णांलयाकडून उपचार केले जात नाहीत त्यांना उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. छत्रपती शिवाजी संग्रालयात उभारण्यात येणारे कोविड रुग्णालय तीन आठवड्याच्या आत सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांनी एकत्र येऊन कोरोनावर मात करावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी बैठकीत केले.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यांच्या उपचार करण्यासाठी निवृत्त झालेल्या डॉक्टरांची मदत घ्यावी. ज्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, अशा रुग्णांच्या घरात व्यवस्था होईल का याची पाहणी करुन त्यांना घरातच उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती प्रत्येक तालुक्याच्या आमदारांना द्यावी, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना बेडची माहिती ऑनलाईन पद्धतीने व्हावी यासाठी एक कक्ष स्थापन करावा, अशा सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी केल्या तर फलटण तालुक्यासाठी आमदार फंडातून व्हेन्टिलेटर उपलब्ध करुन द्यावा, असे आमदार दीपक चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.

छत्रपती शिवाजी संग्राहलयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात कोण कोणत्या सुविधा असणार आहेत याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे बैठकीत दिली.

बैठकीनंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी संग्रालयात उभारण्यात येणाऱ्या कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली.

Published by: Akshay Shitole
First published: September 3, 2020, 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading