सागर सुरवसे, सोलापूर, 22 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवडता खेळ क्रिकेट आहे. त्यांच्या नावाने सुरू असलेली 'शरद चषक' ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते 'शरद चषक' स्पर्धेचं नुकतंच उद्घाटन झालं. यावेळी शिंदे यांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली.
'पवार यांनी ज्याप्रमाणे गुगली टाकून राज्याचे राजकारण बदलले त्याप्रमाणे खेळाडूंनीही गुगलीचा वापर करत सामन्याचे निकाल बदलावेत,' असा गमतीशीर सल्ला सुशीलकुमार शिंदे यांनी युवा क्रिकेटपटूंना दिला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सोलापूर आणि माऊली प्रतिष्ठान, सोलापूरच्या यांच्यावतीने आयोजित शरद चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, अन्नछत्र मंडळाचे चेअरमन जन्मेजयराजे भोसले, माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक चेतन नरोटे, माजी जि.प. अध्यक्षा निशिगंधा माळी, स्पर्धा प्रमुख प्रशांत बाबर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
'केदार जाधवची जिद्द बाळगा'
'शरद चषक' स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी आ. राजन पाटील म्हणाले की, 'क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजणांचा हा आवडता खेळ आहे. शरद पवार सुद्धा यापासून सुटू शकले नाहीत. खेळाडूंनी हार-जीतची पर्वा न करता जिद्दीने खेळ करावा. जिद्दीने खेळ केल्यामुळे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील केदार जाधव हा भारताच्या टीममध्ये पोहचला. त्याची जिद्द सर्वांनी बाळगावी.' यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस, आ. यशवंत माने, भारत जाधव यांनी आपल्या मनोगतात संयोजक किशोर माळी यांचे अभिनंदन करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
'अनेक वर्षांपासून सोलापुरात मोठी क्रिकेट स्पर्धा घेण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. सोलापुरातील उदयोन्मुख खेळाडूंच्या गुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे, या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांसह मित्र परिवाराचे सहकार्य लाभल्याने ही स्पर्धा यशस्वी झाली आहे. प. महाराष्ट्रात या स्पर्धेचा नावलैकीक होईल,' असा विश्वास स्पर्धेचे मुख्य संयोजक किशोर माळी यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.