कोल्हापुरात चिल्लर पार्टीचा बाल चित्रपट महोत्सव

कोल्हापुरात चिल्लर पार्टीचा बाल चित्रपट महोत्सव

चिल्लर पार्टीच्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवास प्रारंभ झाला आहे. चांगला सिनेमा पाहा, सामाजिक जाणीवा जोपासा असं प्रतिपादन मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलं आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 13 फेब्रुवारी - विद्यार्थ्यांनी चांगले सिनेमे पाहिले पाहिजेत, धाडस, चांगली वृत्ती आणि सामाजिक जाणीवा जोपासल्या पाहिजेत. या उपक्रमातून सामाजिक जाणीवा निर्माण होतील, अशी अपेक्षा कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली आहे. शाहू स्मारक भवन इथं चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आयोजित पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दोन दिवसांच्या बालचित्रपट महोत्सवाला मंगळवारी प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता आनंद काळे आणि शिक्षण समितीचे सदस्य नगरसेवक रत्नेश शिरोळकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी महोत्सवासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसोबत कागदी विमान उडवून या महोत्सवाचं अनोख्या पध्दतीने उदघाटन केलं.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते जगभरातील १० उत्कृष्ट बालचित्रपटांचं गोष्टीरूप कथानक असलेल्या ‘शिनेमा पोरांचा’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन करण्यात आलं.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या ३० शाळांतील सुमारे १६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. दिवसभरात बेब, फ्री विली आणि पीटस ड्रॅगन हे सिनेमे दाखविण्यात आले. या महोत्सवाचा लोगो असलेल्या विमानाची प्रतिकृती शाहू स्मारक भवनाच्या प्रवेशद्वारात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याशिवाय महानगरपालिकेतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या कागदी विमानांच्या कलाकृतींचे प्रदर्शन प्रांगणात भरविण्यात आलं  आहे.

आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितलं, की कचरा न करता केलेल्या या पर्यावरणपूरक समारंभाबद्दल चिल्लर पार्टीच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलं पाहिजे. कोल्हापूर शहर स्वच्छ आणि प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी विध्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.अभिनेता आनंद काळे यांनी जगभरातील उत्तम सिनेमे पाहण्याची संधी या महोत्सवात मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि चिल्लर पार्टीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

First published: February 13, 2020, 10:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading