..तर खासदार सुजय विखेंच्या विरोधात तक्रार करणार ही सिनेअभिनेत्री

..तर खासदार सुजय विखेंच्या विरोधात तक्रार करणार ही सिनेअभिनेत्री

गरीब जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी तुम्ही मला मरताना पाहा, असा इशारा दिपाली सैय्यद यांनी दिला होता

  • Share this:

अहमदनगर,15 सप्टेंबर: भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी सांगितले आहे. काही दिवसापूर्वी अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी साकळाई योजना पूर्ण करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावर बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी आंदोलनात सुंदर चेहरे पाहण्यासाठी या, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर दीपाली सय्यद यांनी डॉ.सुजय विखे पाटील यांनी माफी मागितली नाही तर आपण महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

...तर मला मरताना बघा!

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांसाठी जलसंजीवणी ठरणाऱ्या साकळई उपसा जलसिंचन योजनेसाठी अभिनेत्री दिपाली सैय्यद यांनी गेल्या महिन्यात जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र, या योजनेसाठी पाणी शिल्लक नाही, असे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केले होते. त्यावर दिपाली सैय्यद यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. योजनेसाठी पाणी नाही, असे म्हणता मग पुढाऱ्यांचे कारखाने चालवण्यासाठी तुम्ही दुष्काळी भागातील गरीब जनतेला उपाशी मारणार काय, असा सवाल उपस्ठित केला होता. गरीब जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी तुम्ही मला मरताना पाहा, असा इशारा दिपाली सैय्यद यांनी दिला होता.

शरद पवारांनी दिले होते फुसके आश्वासन..

साकळाई पाणी योजनेसाठी दीपाली सय्यद यांचा लढा सुरु आहे. दीपाली सय्यद यांनी गेले दीड महिना गावोगावी फिरून गावकऱ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला होता. त्यातून आपल्या मागणीसाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी त्याठिकाणी सभा घेऊन हा प्रश्न सोडवता येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीही सभा घेऊन साकळाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अनेक दिवस होऊनही योजनेचे काम सुरू झालेले नाही. ही योजना सुरू करावी, या मागणीसाठी दीपाली सय्यद मागील आठ महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासन देऊनही योजनेचे काम सुरू झालं नाही. ही योजना 3 टीएमसीची आहे मात्र, ती शक्य नसेल तर 2 टीएमसी का होईना ही योजना पूर्ण करावी, ही मागणी दीपाली सय्यद यांनी केली आहे.

काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: September 15, 2019, 4:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या