शरद पवारांचं बारामती उद्या राहणार 'बंद'; EDच्या कारवाईचा निषेध

शरद पवारांचं बारामती उद्या राहणार 'बंद'; EDच्या कारवाईचा निषेध

सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचं या संघटनांनी म्हटलं आहे.

  • Share this:

जितेंद्र जाधव 24 सप्टेंबर : ED शरद पवारांविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी बारामतीत बुधवारी 25 सप्टेंबरला बंद पाळण्यात येणार आहे. विविध सामाजिक संघटनांनी या बंदचं आवाहन केलं असून सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचं या संघटनांनी म्हटलं आहे. सकाळी 10 वाजता बारामतीतल्या शारदा प्रांगणात सगळ्यांना एकत्र जमा होण्याचं आवाहन करण्यात आलंय. शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी याचा निवडणुकीत सहानुभूतीसाठी वापर करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच EDने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकांमधील घोटाळ्याशी संबंधित आरोपांवर हा गुन्हा दाखल झालाय. यातल्या अन्य आरोपींमध्ये दिलीपराव देशमुख, ईशरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलवडे, आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणारा राज्य सहकारी बँक घोटाळा आहे तरी काय?

काय म्हणाले शरद पवार?

ते म्हणाले, "माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. बँकेकडून मला फोन आला, त्यात माझं नाव नसल्याची माहिती मला मिळाली." राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "मी राज्य सहकारी बँकेशी संबंधित नव्हतो. मी कधीही बँकेचा संचालक नव्हतो. कुठल्याही बँकेच्या संचालक मंडळावर मी कधी नव्हतो. मी बँकेच्या निवडणुकीलासुद्धा कधी उभा राहिलो नव्हतो. ज्या संस्थेशी माझा कसलाही संबंध नाही, त्याच्यातल्या घोटाळ्यात मला गोवण्यात येत असेल तर काय बोलणार."

"या बँकेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेशी माझा कधीही संबंध नव्हता. आता जी तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यात कर्ज देण्याच्या अनियमितपणाबद्दल तक्रार केली होती. कर्ज देण्याच्या प्रक्रियेशी माझा कसा संबंध? तरीही माझ्यावर केस करण्याविषयी निर्णय घेतला असेल तर धन्यवाद देतो. मी ज्या बँकेचा सभासदसुद्धा नाही. मग त्या बँकेच्या घोटाळ्याच्या गुन्ह्यात माझाही सहभाग कसा नोंदवला?" असा सवाल त्यांनी केला.

निवडणुकीच्या आधी EDचा दणका, शरद पवार आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल!

सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा आरोप आहे. कमकुवत आर्थिक स्थिती असूनही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आली होती. बऱ्याच प्रकरणांमध्ये कोणत्याही तारणविना कर्ज मंजूर केले गेलं होतं. सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत ते विकण्यात आली होती. सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकण्यात आले होते. त्यावरून प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यावर हे गुन्हे दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय आहे राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्याचा आरोप?

- 2005 ते 2010 या कालावधीत राज्य सहकारी बँकेवर वर्चस्व असणाऱ्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जाचे वितरण केलं.

- राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाने सूतगिरणी मिल यासह अनेक सहकारी संस्थांना कर्जाचं वाटप केलं गेलं.

- हे सर्व कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिले गेले. साधारण त्याची रक्कम पंधराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

- अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

- राज्य सहकारी बँकेला या सर्व प्रकरणामुळे आर्थिक नुकसान तर झालेच पण स्वतःच्या सहकारी संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत मोठ्या प्रमाणात फायदा मिळवल्याचा आरोप या याचिकेत केला गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 09:58 PM IST

ताज्या बातम्या