सागर सुरवसे, सोलापूर 15 ऑगस्ट : देशभरात 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असतानाच सोलापूरमध्ये मात्र एका नागरिकाने स्वातंत्र्यदिनीच आत्मदहनाचा प्रयत्न केला. सरकारी अधिकाऱ्यांना कंटाळून त्याने हा प्रयत्न केल्यानं खळबळ उडालीय. जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमावेळी सौदागर साळुंखे या युवकाने रॉकेल ओतूनघेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या स्वच्छ भारत योजनेत ग्रामसेवकाने दाखला दिला नसल्याने या युवकाला अनुदानापासून वंचित राहावं लागलं. त्यामुळे त्याने असा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आलीय.
पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते का? सदाभाऊंचा हल्लाबोल
सौदागर हा उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठाळी गावचा हा युवक आहे. गावातील ग्रामसेवकाने मागच्या सहा महिन्यापासून त्याला शौचालयाचा दाखलाच दिला नाही. त्यामुळे शौचालय अनुदानापासून वंचित राहावे लागल्याने अखेर साळुंखे या लाभार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचललेय. मागील सहा महिन्यापासून ग्रामसेवक गावात फिरकलेच नाहीत. माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या माहितीला उत्तर देत नसल्याने अखेर आपण हे पाऊल उचलले असल्याचेही त्यानं सांगितलं.
जिल्हाधिकारी कार्यलयात कार्यक्रम सुरू असतानाच सौदागर याने अंगावर रॉकेल ओतले. त्यावेळी तिथे असलेल्या चाणक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या हे लक्षात आलं. त्यांनी तातडीने धाव घेऊन सौदागरच्या हातातला डबा हिसकावला आणि त्याला ताब्यात घेतलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सरकारी काम म्हटलं की ग्रामीण भागात लोकांच्या अंगावर काटा येतो. सामान्य नागरिकांना साध्या कामासाठी हेलपाटे घालावे लागतात. तरीही त्याची कामं होत नाहीत. त्यामुळे त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची कामं रखडले जातात. या कामांसाठी त्यांच्याकडून लाच घेतली जाते. सरकारने अनेक उपाययोजना करूनही गावपातळीवर त्याची दखल घेतली जात नाही असाच सामान्य माणसांना अनुभव आहे.