पत्नीचा मोडला पाय, मुलगाही झाला जखमी; संतप्त पतीचे रस्त्यावरच झोपून आंदोलन

पत्नीचा मोडला पाय, मुलगाही झाला जखमी; संतप्त पतीचे रस्त्यावरच झोपून आंदोलन

रोडवरील खड्ड्यामुळे गाडीला अपघात झाला. त्यात महिलेचा पाय मोडला. संतप्त पतीने मार्गावर झोपून रस्ता अडवला.

  • Share this:

कोल्हापूर,27 डिसेंबर: महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आंदोलन कोल्हापूर शहरात केली जातात. चळवळीचं शहर म्हणूनही कोल्हापूरची ओळख आहे. पण एक व्यक्ती आपल्या आंदोलनामुळे कोल्हापूरसह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. फुलेवाडी-बालिंगा रोडवर एका संतप्त वाहनचालकाने चक्क रस्त्यावर झोपून आंदोलन केले. रोडवरील खड्ड्यामुळे गाडीला अपघात झाला. त्यात महिलेचा पाय मोडला. तिच्या संतप्त पतीने मार्गावर झोपून रस्ता अडवला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी-बालिंगा दरम्यानचा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. महिनाभरात अनेक अपघात झाले आहेत.

कोल्हापूर शहरातून गगनबावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. कोल्हापूरजवळ फुलेवाडी नावाचे उपनगर आहे. रंकाळा तलावापासून फुलेवाडीला जाताना या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याच खड्ड्यांमुळे फुलेवाडीमधील रहिवासी शिल्पा पोरे आणि त्यांचा मुलगा शौर्य हे दोघे दुचाकीवरून जाताना पडले. यावेळी शिल्पा आणि शौर्य हे दोघेही जखमी झाले. शिल्पा यांचा पाय फ्रेक्चर झाला. त्यानंतर विजय पोरे यांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. पण पत्नी आणि मुलाच्या वेदना पाहून विजय पोरे यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केले. रंकाळा-गगनबावडा मार्गावरचा एका पतीचा हा आक्रोश संपूर्ण कोल्हापूरने पाहिला, विजय हे जवळपास 2 तास खड्ड्यात झोपून होते. यावेळी जवळपास तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, असा पवित्रा विजय यांनी घेतला होता. पण पोलिसांनी कशीबशी विजय यांची समजूत काढली. बांधकाम विभागाकडे याबाबत पाठपुरावा करू, महापालिकेकडेही करू असा शब्द पोलिसांनी दिल्यावर विजय यांनी आपल आंदोलन मागे घेतले.

कोल्हापूर रंकाळा गगनबावडा हा तळकोकणात जाणारा प्रमुख राज्यमार्ग आहे. पण फुलेवाडी परिसरात 100 मिटर अंतराच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याचा त्रास शहरवासियांना होत असूनही प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 09:38 AM IST

ताज्या बातम्या