नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : गेल्या दोनचार दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यात पार दाणादाण उडवली आहे. शेतमालाचे अतोनात नुकसान झालं तर शहरवासीयांनाही याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. अशात भारताच्या हवामान विभागाने ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या परतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तो पुढील आठवड्यापर्यंत अनेक राज्यांमधून परत जाईल. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, सध्या परतीच्या मान्सूनची रेषा बिहारमधील रक्सौल, झारखंडमधील डाल्टनगंज, मध्य प्रदेशातील छिंदवाडा, महाराष्ट्रातील जळगावमधून जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसांत झारखंडमध्ये मान्सूनचा पाऊस थांबण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 15 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. 16 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यासोबतच 17 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 18 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात खालच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रात नवीन चक्री दाब केंद्र तयार होत आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रातही कर्नाटक आणि कोकण किनारपट्टीजवळील खालच्या उष्णकटिबंधीय भागात नवीन चक्रीवादळ दाब केंद्र तयार होत आहे. या दोन्ही परिस्थितीमुळे पुढील आठवड्यात देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. याशिवाय वेस्टर्न डिस्टर्बन्सही तयार होत आहे.
वाचा - पिकअप व्हॅनसह तिघे गेले वाहून, मालाचे पैसेही बुडाले, डोळ्यादेखत मित्रही गेला, बीडमधील घटना
IMD नुसार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बंगालचा गंगेचा मैदान, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांशिवाय कोकण, कर्नाटक, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, कर्नाटक आणि केरळ, लक्षद्वीपमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच 18 आणि 19 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील मैदानी भागातील तापमान आणखी घसरून थंडी वाढणार असल्याचे मानले जात आहे.
मात्र, या चक्रीवादळाबाबत एनडीटीव्हीने भारतीय हवामान विभागाचे संचालक डॉ. एम. महापात्रा यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी अशी कोणतीही शक्यता नाकारली. ते म्हणाले की, हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे आम्ही अद्याप याबाबत कोणतीही सूचना जारी केलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Rain fall, Rain flood