मुंबई, 09 फेब्रुवारी: एकीकडे राज्यात थंडीचा जोर वाढत असताना आता पुढील 48 तासांत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 ते 48 तासांत महराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे नागरिक आधिक हैराण झाले आहेत. आधीच पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे अनेक बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे.
मुंबईसह अनेक ठिकाणी दोन दिवस गारवा वाढला असून शनिवारी पनवेल इथे किमान 12 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागातही तापमानाचा पारा घसरला आहे. पुढच्या दोन दिवसांत मुंबईसह उपनगरांमधील तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे यवतमाळ, लातूर, चंद्रपूर, नांदडे, सोलापूर, सांगली परिसरात वीजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुढच्या 48 तासांत असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातील काही भागांमध्येही यावेळी ढगांचा गडगडाट आणि वादळी वारे येतील अशी शक्यता आहे.
हेही वाचा-भरधाव दुचाकीचा चिडलेल्या हत्तीनं केला पाठलाग, पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळाचा मराठवाड्यावर परिणाम होणार आहे. त्यानुसार नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर दिवसा 31 ते 32 अंश सेल्सियस तापमानापर्यंत पारा चढण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मुंबईतही रात्री थंडी जास्त आणि दिवसा हवामान उष्ण राहणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर होत असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन आणि रुग्णालयाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा-शिकारी खुद शिकार हो गया! चक्क बेडकाने सापाला खाल्लं, पाहा थरारक VIDEO