मुंबई, 18 मे: मागील काही दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टीवर सातत्यानं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ मुंबईला धडकल्यानंतर, काल सोमवारी मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. काल मुंबईत सांताक्रुझ आणि कुलाबा याठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याठिकाणी अनुक्रमे 230 मीमी आणि 207 मीमी एवढा पाऊस झाला आहे. तर पालघरमध्ये 298 मीमी इतका पाऊस झाला आहे.
सध्या तौत्के वादळ मुंबईपासून पुढं सरकलं आहे. तसेच कालच्या तुलनेत तौत्के वादळाचा धोका कमी झाला आहे. परंतु अजून मुंबई, गुजरातसह किनारपट्टीवर 100 किमी प्रतितास वेगानं वारा वाहत आहे. त्यामुळे तौत्के वादळाचं संकट टळलं असलं तरी अद्याप पावसाचा धोका कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील तीन तासांत राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पालघर याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
Nowcast Warning issued at 1400 Hrs Thunderstorm accompanied with lightning and mod to intense spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph is likely to occur at isolated places in the districts of Sindhudurg, Ratnagiri next 3 hours. -IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 18, 2021
पुढील तीन तासांत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान येथील वारा 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वाहणार आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याचबरोबर पालघर जिल्ह्याला हवामान खात्यानं हाय अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत पालघर जिल्ह्यात 40 ते 50 किमी प्रतितास वेगानं वारा वाहणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा-चक्रीवादळाचा रुद्रावतार! विजेच्या खांबासह पेट्रोल पंपही उखडला, पाहा VIDEO
दुसरीकडे, तौत्के वादळ सध्या गुजरातला जाऊन धडकलं आहे. काल तौत्के वादळानं महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर येऊन संपूर्ण मुंबईकरांच्या मनात धडकी निर्माण केली होती. काल मुबंईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. तर असंख्य झाडं अक्षरशः उन्मळून पडली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Ratnagiri, Sindhudurg, Weather forecast, Weather warnings