मुंबई, 02 एप्रिल: मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमान (Temperature in maharashtra) वाढत गेलं आहे. दोन दिवसांपूर्वी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात 43.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढील काही दिवस राज्यातील तापमान (Maharashtra Weather Update) काही अंशी स्थिर राहिलं आणि त्यानंतर पुन्हा उष्णता वाढेल असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. यानंतर आता महाराष्ट्रातील काही भागात आज तापमानाची लाट ओसरणार आहे. उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाण्यात आज काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी हवेत गारवा जाणवणार आहे.
खरतर गेल्या चार-पाच दिवसांपासून अंदमान आणि निकोबार आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ईशान्य भारतातील काही राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाणे परिसरात आज काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांसोबतचं ठाणेकरांनाही थंड हवेचा सुखद धक्का बसणार आहे.
उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे हा परिसर वगळता राज्यातील इतर ठिकाणी काही प्रमाणात तापमान स्थिर असण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सियसच्या आसपास राहणार आहे. त्यानंतर पुण्यातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातील लोकांनी सकाळी 11 ते 4 च्या दरम्यान घरातून बाहेर पडणं टाळा. तसेच खूप आवश्यक काम असेल तर घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी प्या.
उत्तर कोकणात व मुंबई, ठाणे आकाश किंचीत ढगाळ ☁☁ वातावरण, परीणामी हवेत सुखद गारवा बहुतेक ठिकाणी... pic.twitter.com/sECgLsO8nF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 2, 2021
विदर्भात उष्णतेची दाहकता सुरूच
मुंबई आणि कोकण पट्ट्यातील नागरिकांना आज काही प्रमाणात दिलासा दिला असला तर विदर्भात सुर्याची दाहकता कायम आहे. आज नागपूरातील कमाल तापमान 39 अंश सेल्सियस असून चंद्रपूरला सुर्याने पुन्हा टार्गेट केलं आहे. आज चंद्रपुरातील कमाल तापमान 42 अंश सेल्सियस असून किमान तापमान 21 अंश सेल्सियस इतकं आहे. चंद्रपुरात रात्रीचं तापमान दिवसा दुप्पट होतं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Thane, Todays weather