मुंबई, 27 जानेवारी : यंदाच्या वर्षाची सुरुवातही थंडीने झाल्याने मुंबईकर चांगलेच आनंदात होते. कधी नव्हे ते घरातील कपाटांमध्ये ठेवलेले स्वेटर बाहेर काढण्याची संधी मुंबईकरांना मिळाली. मात्र थंडीचा असाच अनुभव या आठवड्यातही घेता येणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन तीन दिवसानंतर महाराष्ट्राच्या काही भागांत थंडी वाढण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तविली असून सरासरी किमान तापमानापेक्षा पारा खाली जाईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.
या काळात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात मात्र थंडी चांगलीच वाढेल असं सांगण्यात येतंय त्यामुळे हिवाळा अजून संपलेला नाही. मकर संक्रांतीनंतर गारठा कमी होऊ लागतो. हेच आतापर्यंत आपण मानत आलो आहोत. परंतु गेल्या काही वर्षांत ऋतूमध्ये अनेक बदल होत आहेत. गेलेली थंडी वारंवार परतून येते. त्यामुळे 2019 ला तर मुंबईतही थंडी मार्चपर्यंत जाणवत होती. याहीवर्षी थंडी अशी परतून येईल, असे संकेत देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे आता ऋतूमध्ये झालेल्या बदलांची माहिती भारतीय हवामान खातं लवकरच जाहीर करणार आहे.
विशेषतः मान्सूनमध्ये येणारा पाऊस जरा पुढे गेला आहे. पावसाच्या येण्याच्या तारखांमध्ये फार बदल होणार नसला तरीही परत जाण्याच्या तारखांमध्ये मात्र मोठा बदल झाला आहे. हा बदल भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये शेतकरी व्यावसायिक सर्वसामान्य यांच्यासाठी ची माहिती हवामान खातं एप्रिलमध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे. आता साधारणपणे पन्नास वर्षे जुन्या तारखा अजूनही वापरल्या जात आहेत. पण झालेले बदल मात्र आता जाहीर करण्यात येणार आहे. हे बदल फार मोठे नसले तरी महत्त्वाचे आहेत त्यानुसार देशाचा सरकार शेतकरी हे आपल्या पुढल्या काळासाठी नियोजन करीत असतात.