मुंबई, 26 जानेवारी : राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. त्यातच आता राज्यातील थंडीची परिस्थिती पाहता हवामान खात्याने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढच्या आठवड्यात थंडीची लाट येऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मुंबईसुद्धा गारठणार -
पुढच्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तसेच मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. मात्र, याबरोबरच दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे आणि 20 जानेवारीनंतर थंडीचा जोर अधिक वाढू शकतो अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्ती केली आहे.
हवामान खात्याने नेमकं काय म्हटलं -
सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यात आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढू शकतो, असे अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची ही लाट कायम राहिल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही वाचा - मुंबई गारठली, तापमान 14.8 अंशावर, पारा आणखी घसरणार
पिकांवरही होणार परिणाम -
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातही अजून थंडीचा जोर कायम आहे. तापमानाचा पारा घसरल्याने त्याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तर गहू, हरभरा, मका या पिकांनाही या वातावरणाचा फटका बसणार असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Weather, Weather Forecast, Weather Update