सिंधुदूर्ग, 03 मार्च : भगवा अंगावर असलेल्या कुठल्याही शिवसैनिकाला किंवा भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केलीत तर विनायक राऊत तुम्हालाही चपलेने मारू, असं म्हणत भाजप नेते प्रमोद जठार यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर विखारी टीका केली आहे. या विधानामुळे सध्या कोकणातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या आक्रमक विधानाला कोकणात नाणार प्रकल्पावरून सुरु असलेल्या वादंगाची पार्श्वभूमी आहे.
कोकणात नाणारवरून राजकारण चांगलंच तापणार असं दिसत आहे. काल शिवसेना आणि नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातल्या कृती समितीने जाहीर सभा घेतली होती. यामध्ये बोलतांना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी, 'शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन तर कोणी नाणारच्या रिफायनरीचं समर्थन करणार असेल, तर त्याला चपलेने झोडून काढा' असं आक्रमक विधान केलं होतं. गुजरातच्या दलालांना रिफायनरी काहीही करून हवी असल्याची टीकाही राऊतांनी केली आहे.
नाणार समर्थकांचंही उत्तर
शिवसेना आणि नाणार विरोधी कृती समितीच्या रविवारच्या सभेला भाजप आणि नाणार समर्थकांनी सोमवारी जाहीर सभा घेऊन उत्तर दिलं. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या आक्रमक भाषेनंतर त्याच भाषेत राऊत यांना उत्तर देण्यात आलं. भाजपाचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आक्रमक विधान केलं. 'भगवा झेंडा अंगावर असलेल्या कुठल्याही शिवसैनिकाला किंवा भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केलीत तर विनायक राउत तुम्हालाही चपलेने मारू' यामुळे नाणारबद्दल आता समर्थक आणि विरोधक अशा दोघांकडूनही आक्रमक विधाने होऊ लागली आहेत.
मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
याच जाहीर सभेत बोलताना माजी आमदार प्रमोद जठार यांनी खळबळजनक आरोप केला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत काहीही आरोप करो पण, रिफायनरीसाठी जागा खरेदी करणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचेच नातेवाईक असल्याचा दावा जठार यांनी केला.
प्रमोद जठार यांच्या या आरोपांमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर वेळ आली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांची नावं जाहीर करू अशा इशाराही त्यांनी दिला आहे. याच जाहीर सभेत बोलताना प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत यांना 2024 च्या निवडणुकांसाठी आव्हान दिलं आहे.
'2024 ला निवायक राऊत कसे निवडून येतात ते आपण पाहू'अशा शब्दात आव्हान दिलं आहे. तर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या मनात आहे रिफायनरी व्हावी असं असेल तर त्यांनी भाजपात यावं. त्यांचं स्वागत असल्याचंही जठार यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pramod jathar, Vinayak Raut