Home /News /maharashtra /

आमचा पोपट हरवला, नागपूरकराची पोलिसांकडे तक्रार

आमचा पोपट हरवला, नागपूरकराची पोलिसांकडे तक्रार

'पोपट ‘मिसिंग’ असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे आणि पोपट आढळल्यास पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी'

नागपूर, 05 मार्च : सर्व समस्यांचे एकच ठिकाण म्हणजे पोलिस ठाणे, असा अनेकांचा समज आहे. जवळपास रोज काहीतरी विचित्र तक्रारी पोलिसांकडे येतच राहतात. काही दिवसांपूर्वीच श्वान बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांत आली. आता चक्क पोपट उडाल्याची तक्रारही नागपूर पोलिसांकडे आली. आता तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिसांनीही या तक्रारीचीही दखल घेतली आहे. पोपट ‘मिसिंग’ असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे आणि पोपट आढळल्यास पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी, असा आदेशही काढला आहे. आत्ता बोला! पोपट उडाल्याच्या तक्रारीची चर्चा बुधवारी पोलीस वर्तुळात चांगलीच रंगली. विनोदकुमार माहोरे यांनी ही तक्रार केली आहे. झिंगाबाई टाकळीतील महाराणानगरमध्ये विनोदकुमार माहोरे राहतात. ते वेकोलीत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे आफ्रिकन ग्रे जातीचा ‘ब्राव्हो’ नावाचा पोपट होता. मंगळवारी सायंकाळी ब्राव्हो पिंजऱ्यातून उडाला. माहोरे यांनी ब्राव्होच्या विस्तृत वर्णनासह मानकापूर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तो बेपत्ता असल्याची नोंद घेत ‘मिसिंग नंबर’ दिला. पोपट आढळल्यास त्याची सूचना पोलिसांना देण्याची सूचनाही तक्रारीवर करण्यात आली. परंतु, हा पोपट शोधायचा कसा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. पहाडी पोपटाच्या तस्करीचा डाव फसला, वनविभागाने टाकली धाड! दरम्यान,  वर्ध्यातील आर्वी नाका परिसरातील एका दुकानात पहाडी पोपटाची तस्करी केली जात असल्याची घटना समोर आली आहे. वन विभागाने धाड टाकून पहाडी पोपटांसह इतर अन्य प्राण्यांना ताब्यात घेतलं आहे. शहरातील आर्वी नाका परिसरात ऑस्कर फिश अँड पॉट दुकानावर ही कारवाई करण्यात आली. शहरात असणाऱ्या  या दुकानातून वन्यप्राण्यांना आणि पक्षांची विक्री केली जात आहे. याची माहिती पीपल्स फॉर अनिमल्सच्या कार्यकर्त्यांना मिळाली. वर्धा वनविभागाचे कर्मचारी आणि पीपल्स फॉर अनिमल्सचे कार्यकर्ते यांनी मिळून ही धाड घातली. या पहाडी पोपटाची तस्करी होत असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यानी धाड टाकून कारवाई केली. यासोबतच विविध जातीचे वन्यपक्षांची या दुकानांतून विक्री केली जात असल्याची माहिती पीपल्स फॉर अनिमल्स यांना मिळाली होती. चार ते पाच हजारात विकल्या जाणाऱ्या या पोपटाला मोठी मागणी आहे. या प्रकरणी आरोपी सारंग खाडे याला अटक करण्यात आली असून वन्यजीव कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याला आज वर्ध्याच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या