बब्बू शेख (प्रतिनिधी)
मनमाड, 12 मे- दुष्काळी परिस्थितीमुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोर-दरोडेखोर रोख रकमेसह मौल्यवान वस्तू चोरून नेतात. परंतु मनमाड शहरात चक्क पाणी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. श्रावस्ती नगरात ही घटना घडली असून चोरट्यांनी सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी पिण्यासाठी टाकीत साठवून ठेवलेल्या 300 लिटर पाण्यावर डल्ला मारून पसार झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
एकीकडे अगोदरच शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत असताना दुसरीकडे पाणी चोरीच्या घटनेमुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाण्याची राखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या प्रकरणी या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज देण्यात आल्याची माहिती आहिरे यांनी दिली. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठल्यामुळे मनमाड शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या धरणात पाण्याचा मृत साठा शिल्लक असून त्यातून पालिकेतर्फे शहरात 22 ते 25 दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. पालिकेतर्फे दिले जाणारे पाणी एक महिना पुरवावे लागते. त्यामुळे ज्या दिवशी नळ येतात त्या दिवशी घरातील ग्लासापासून मोठ्या भांडयापर्यंत पाणी भरून ठेवण्यासाठी घरातील सर्वच जण धडपड करतात.
सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे हे शहरातील श्रावस्ती नगर भागात राहतात. काही दिवसांपूर्वी पालिकेतर्फे पाणी सोडण्यात आले होते. आहिरे यांनी त्यांच्या छतावर असलेल्या टाकीत पाणी भरून ठेवले होते. त्यांचा जिना बाहेरून असल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी छतावर जावून टाकीत भरून ठेवलेल्या 500 पैकी 300 लिटर पाणी चोरून पसार झाले. सकाळी टाकीतून पाणी येत नसल्याचे पाहून आहिरे छतावर जावून पहिले असता टाकीत पाणी नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दिली आहे. त्यात महटले आहे की, नगरपालिकेतर्फे नळाद्वारे देण्यात आलेले पाणी मी टाकीत साठवून ठेवले होते मात्र चोरट्यांनी 300 लिटर पाणी चोरून नेल्यामुळे माझ्या कुटुंबियावर भीषण पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. याबाबत गुन्हा दाखल करून पाणी चोरांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जगात तिसरे महायुद्ध झाले तर पाण्यासाठी होईल, असे भाकीत 30 वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्राचे महासचिव बुतरस घालीआणि 1995 साली विश्व बँकचे उपाध्यक्ष इस्माइल सेराग्लेडिन यांनी केले होते. त्यांचे हे भाकीत खरे ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सध्या पाण्यावरून युद्ध होत नसले तरी मात्र भीषण पाणीटंचाईमुळे अनेक ठिकाणी हाणामाऱ्या होत आहेत.
SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'