नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर तरुण आणि तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पाहा हा VIDEO

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना बाईक नीट न लावल्याच्या मुद्द्यावरून आरोपी तरुण आणि तरुणींमध्ये वाद झाला होता

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना बाईक नीट न लावल्याच्या मुद्द्यावरून आरोपी तरुण आणि तरुणींमध्ये वाद झाला होता

  • Share this:
नागपूर, 15 मार्च : नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.  नागपूरमधील वाडी परिसरात पेट्रोल पंपावर तरुण आणि तरुणींच्या गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेत वाडी परिसरातील एका पेट्रोल पंपावर काही तरुणांनी तरुणींच्या समूहाला पेट्रोल पंपावर जबर मारहाण केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 10 मार्च म्हणजेच होळीच्या दिवशीची आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना  वाहन नीट न लावल्याच्या मुद्द्यावरून आरोपी तरुण आणि तरुणींमध्ये वाद झाला होता. या तरुणांनी अश्लील शेरेबाजी केल्यामुळे तरुणीने समोर येऊन जाब विचारला. तेव्हा मद्यपान केलेल्या तरुणाने तरुणीवर हात उगारला. तरुणाने हात उगारल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने ही हाताने तरुणाला मारहाण सुरू केली. हे पाहून तरुणाच्या सोबतच्या इतर तरुणांनी तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले. तरुणींच्या समुहातील एका तरुणीने बचावासाठी पेट्रोल पंपावरील आग विझवण्याचे सिलेंडर हातात घेऊन मारहाण करणाऱ्या तरुणावर हल्ला केला. धक्कादायक म्हणजे, तरुण - तरुणींच्या गटात जेव्हा मारहाण सुरू होती तेव्हा तिथे कर्मचारी आणि पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक हे बघ्याच्या भूमिकेत होते. जेव्हा हे तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा एक-दोन व्यक्तींनी मध्यस्ती करून तरुणींची सुटका केली. परंतु, या दोन्ही तरुणांनी तरुणींना बेदम मारहाण केली होती. या संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील  सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर जखमी तरुणींनी पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या घटनेत जखमी तरूणीच्या तक्रारीवर हल्लेखोर तरुणांवर मारहाण, विनयभंग सारखे गुन्हे नोंदवून दोघांना अटक केली आहे. तर एक जण फरार आहे.
First published: