वाशिम, 21 जानेवारी : कुटुंबात कुणीही कुपोषित राहायला नको या संकल्पनेतून काटा या गावातील 7 कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना सदृढ बनविण्याचा अभिनव उपक्रम वाशिमच्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी पोषणमहा निमित्त हाती घेतला आहे.
या बालकांचा शारीरिक विकास व्हावा याकरीता बालकांना पोषक अन्नधान्यासह विविध जीवनावश्यक वस्तूंचे त्यांच्या वतीने वाटप करण्यात आले.
महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी अनसिंग गावातील 6 कुपोषित बालके दत्तक घेतली होती, त्यापैकी 5 बालके आज घडीला कुपोषण मुक्त झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा काटा गावातील अजून 7 कुपोषित बालके त्यांनी दत्तक घेतली आहेत.
आजची बालके म्हणजे देशाचं उज्वल भविष्य असून ती सुदृढ व सशक्त असावी याकरीता शासन स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच संकल्पनेतून सप्टेंबर महिना हा पोषणमाह म्हणून साजरा करण्यात येतो. वाशिम जिल्ह्यात यानिमित्त नागरिकांच्या आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी तसंच महिला, किशोरवयीन मुली, स्तनदा माता यांना पोषणमूल्ये देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत.
दत्तक घेण्यात आलेल्या बालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या निकोप शारीरिक वाढीकरता आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना आपण करणार असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी यावेळी सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेव्यतिरिक्त सामाजिक जाणिवेतून वैयक्तिकरित्या कुपोषणाविरुद्ध चालवलेल्या या मोहिमेचे कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Washim, WASHIM NEWS