वाशिम, 20 सप्टेंबर : शेतात गेलेल्या पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना आज कोळगांव शेतशिवारात उघडकीस आली. कोळगांव येथील सागर किसन मुळे असं हत्या करण्यात आलेल्या 45 वर्षीय महिलेचं नाव आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.
सागर मुळे ही महिला तिच्या शेतात म्हैस चारण्यासाठी गेली होती. तिच्या मागोमाग तिचा पती किसन कुंडलिक मुळे हा कुऱ्हाड घेऊन गेल्याचं त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर आणि सून शारदा यांनी काका मधुकर मुळे यांना सांगितलं. सायंकाळ होऊनही सागर मुळे ही महिला घरी न परतल्यानं कुटुंबातील सदस्यांनी तिचा शेत व परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र शेतात शोध घेत असताना कुटुंबीयांना केवळ म्हैस एका झाडाला बांधलेली दिसली. ती महिला कुठेही आढळून येत नव्हती. तसंच तिचा पती किसन मुळे याचाही ठावठिकाणा लागत नव्हता.
कुटुंबातील आज सकाळी पुन्हा शोध सुरू केला असता सागर मुळे ही महिला शेतात मृतावस्थेत आढळली. तिच्या मानेवर आणि पाठीवर धारदार शस्त्राच्या गंभीर जखमा होत्या.
दरम्यान, सागर मुळे आणि तिचा पती किसन मुळे यांचं मागील काही महिन्यांपासून पटत नसल्यानं ते दोघेही विभक्त राहत असत. दररोज कुठल्या ना कुठल्या कारणाने किसन मुळे पत्नीसोबत वाद करत असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. सागर मुळेची पती किसन मुळे यानेच हत्या केल्याची माहिती मालेगांव पोलिसात मधुकर मुळे यांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे.
याप्रकरणी ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन काळे हे अधिक तपास करत आहेत. या हत्येमुळं कोळगांव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.