वाशिम, 8 सप्टेंबर : वाशिम जिल्ह्यातील नागपूर - औरंगाबाद या द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रकने बाईकला समोरून जोरदार धडक दिल्याने आज सायंकाळी हा अपघात झाला. अपघातात 25 वर्षीय तरुण जागीच ठार झाला असून धनजंय भागवत पुरी असं मृत तरुणाचं नाव आहे.
नागपूर - औरंगाबाद महामार्गावर मेहकरकडे जात असलेल्या ट्रकने चांडस कळमगव्हाण दरम्यान दुचाकीस्वाराला सिमेंटच्या ट्रकने चिरडलं. त्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातस्थळी शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, पोलीस जमादार दामोदर इप्पर हे हजर झाल्यानंतर त्यांनी पळून जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून कुकसा फाट्यानजीक ट्रकचालकाला पकडले.
मृत तरुण हा नंधाना येथील रहिवाशी होता. त्याच्या निधनाने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, लॉकडाऊन काळात वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आल्याने रस्ते अपघातांमध्ये मोठी घट झाली होती. मात्र नंतरच्या काळात लॉकडाऊन उठवल्यानंतर पुन्हा रस्त्यावरून वेगात वाहने धावू लागली आणि परिणामी अपघातांचंही प्रमाण वाढलं.
वाहन चालवताना वेगावर नियंत्रण नसल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे वाहनचालकांनी याबाबतची खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.